राज्य पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेलाच नाही!
By admin | Published: July 8, 2015 02:29 AM2015-07-08T02:29:37+5:302015-07-08T02:29:37+5:30
राज्यातील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. पोलीस आणि गुन्हेगारांची साखळी असल्यामुळेच गुन्हेगारांना जामीन मिळतो, अशा शब्दांत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृह खात्याला ‘घरचा’ अहेर दिला.
सांगली/कोल्हापूर : राज्यातील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. पोलीस आणि गुन्हेगारांची साखळी असल्यामुळेच गुन्हेगारांना जामीन मिळतो, अशा शब्दांत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खात्याला ‘घरचा’ अहेर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री पाटील यांनी पोलीस खात्यावर एकप्रकारे मुक्तचिंतनच केले. ते म्हणाले, की अनेकदा आंदोलनकर्ते पोलिसांवर तर गुन्हेगार हे पोलीस ठाण्यांवर हल्ले करतात. सुईच्या कामासाठी तलवारीचा वापर न करता बंदुकीचा धाक दाखवला पाहिजे, तरच पोलिसांचा वचक राहील. समाजातील गुन्हेगारी आणि माफियाराज यांचा वेळीच बंदोबस्त करा अन्यथा काही खैर नाही, असेही त्यांनी सुनावले.
सहकार मंत्री चंद्रकांत दादा हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू गोटातील मंत्री म्हणून ओळखले जातात. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कोल्हापूर सासुरवाडी असल्याने दादांचे दिल्लीशी थेट संबंध आहेत. शहा यांच्या शिफारशीवरूनच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन सार्वजनिक बांधकाम आणि सहकार अशी वजनदार खातीही मिळाली. त्यामुळे मंत्रिमंडळात दादांचा शब्द प्रमाण मानला जातो. (प्रतिनिधी)
ही तर कोल्हपूरची देन - पवार
सहकारमंत्र्यांनी पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेबद्दल उलटसुलट विधाने केली असल्याचे कोल्हापुरात पत्रकारांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर मोठ्या उपहासात्मक शब्दांत पवार म्हणाले, की चंद्रकांतदादा ही तर कोल्हापूरने महाराष्ट्राला दिलेली मोठी देन आहे! त्यांच्यासारखा विविध प्रश्नांवर बेधडकपणे भूमिका मांडणारा मंत्री मी आजपर्यंत बघितला नाही. त्याबद्दल कोल्हापूरकरांचे आभारच मानायला पाहिजेत !
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर अग्निशमन यंत्राच्या खरेदीतील अनियमितेबाबत आरोप झाला, तेव्हा तावडेंची पाठराखण करण्यासाठी चंद्रकातदादा पुढे सरसावले होते. शिवाय शिवसेना आणि भाजपात समन्वयाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे दादांना ‘संकटमोचक’ म्हणूनच संबोधले जाते. असे असताना अचानक त्यांनी फडणवीस यांच्याकडील गृह खात्याचे ‘पोस्टमॉर्टेम’ केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे.