पोलीस भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 06:48 AM2018-04-29T06:48:39+5:302018-04-29T06:48:39+5:30

पोलीस भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती असल्याची माहिती पुढे आली आहे़ नांदेड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून रोज नवनवी माहिती मिळत आहे.

State scope of the Police recruitment scandal | पोलीस भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती

पोलीस भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती

Next

नांदेड : पोलीस भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती असल्याची माहिती पुढे आली आहे़ नांदेड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून रोज नवनवी माहिती मिळत आहे. प्रवीण भटकर व त्याच्या सहकाऱ्यांनी १७ जिल्ह्यांतील भरती प्रक्रियेच्या सॉफ्टवेअरचे काम घेतले असून, तोच घोटाळ्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे़ काही पोलीस अधिकारीही संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.
नांदेड पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत ओएमआर (आॅप्टिकल मार्क रीडिंग) पद्धतीने गुणवाढ केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ त्याआधारे पोलिसांनी १३ परीक्षार्थींसह २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ एसएसजी कंपनीचे दोन संचालक, एक पोलीस कर्मचारी यांच्यासह ११ परीक्षार्थींना अटक करण्यात आली आहे़ मुख्य आरोपी प्रवीण भटकरसह पाच जण फरार आहेत़
प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आला आहे़ मुख्यमंत्र्यांची पोलीस महासंचालक भेट घेऊन राज्यस्तरीय चौकशीची परवानगी मागण्याची शक्यता आहे़
नोकरभरतीच्या उत्तरपत्रिका ओएमआर पद्धतीने तपासल्या जातात़ प्रवीण भटकरने वेगवेगळ्या सॉफ्टवेअर कंपनीचा प्रतिनिधी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये ही कामे मिळविल्याचे समजते. डॉ़ विजय भटकर यांचा पुतण्या असल्याचे तो आवर्जून सांगायचा़ डॉ. भटकर यांनी मात्र तीन वर्षांपासून या कंपनीशी आपला कोणताही संंबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पुण्यातील परीक्षेत गैरप्रकाराचा संशय
पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नांदेड, औरंगाबाद, जालना तसेच पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतील ३० उमेदवारांच्या उत्तरपत्रिका लिहून, त्या मुख्य गठ्ठ्यात मिसळण्यात आल्याची माहिती आहे.

ओएमआर स्कॅनिंगचे काम मिळाल्यानंतर भटकर मध्यस्थामार्फत उमेदवारांचा शोध घ्यायचा़ शिरिष अवधूत व स्वप्निल साळुंखे हे कंपनीचे संचालक गुण वाढवून घ्यायचे़ परीक्षार्थीचे काम झाल्यानंतरच ते पैसे घ्यायचे, अशीही माहिती पुढे आली आहे.

चार मध्यस्थ : सध्या औरंगाबाद येथे असलेले पोलीस कर्मचारी नामदेव ढाकणे, शुक्राचार्य टेकाळे (एसआरपी), वाशिमचे शेख आगा, नांदेडचे दिनेश गजभारे हे चौघे मध्यस्थ होते़ त्यांनी नांदेडच्या पोलीस भरतीत गुणवाढीसाठी १३ उमेदवार शोधले. नामदेव ढाकणे व शुक्राचार्य टेकाळे यांनी देऊळगाव राजा येथील सहा उमेदवारांकडून पैसे घेतले होते़

वडिलांकडूनही पैसे : नामदेव ढाकणे याने २००७ मध्ये स्वत:च्या भावाला पोलीस दलात नोकरी देण्यासाठी आपल्या वडिलांकडूनही पैसे घेतल्याची माहिती आहे़

Web Title: State scope of the Police recruitment scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.