राज्याला ‘शाही’स्नान!

By admin | Published: September 19, 2015 04:55 AM2015-09-19T04:55:28+5:302015-09-19T04:55:28+5:30

गणरायाच्या आगमनानंतर ऋषिपंचमीचा मुहूर्त साधून आलेल्या सिंहस्थातील तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीत वरुणराजाने आभाळमाया दाखवून अवघ्या महाराष्ट्राला

State 'Shahi' sanan! | राज्याला ‘शाही’स्नान!

राज्याला ‘शाही’स्नान!

Next

मुंबई : गणरायाच्या आगमनानंतर ऋषिपंचमीचा मुहूर्त साधून आलेल्या सिंहस्थातील तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीत वरुणराजाने आभाळमाया दाखवून अवघ्या महाराष्ट्राला शाहीस्नान घातले आणि गौरीचीही पाऊलवाट ओली केली. आगमनाच्या तिथीपासून दडी मारून बसलेल्या पावसाने परतीच्या प्रवासात आपली मूठ सैल केल्याने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला, तर राज्यातील बहुसंख्य भागातील धरणसाठे तुडुंब भरल्याने वर्षभराची तहानही भागली जाण्याची अपेक्षा आहे.
गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने महाराष्ट्र भिजला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना तसेच खान्देशासह अमरावती विभागातील ५५ पैकी ३७ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. नाशिक, नगर, सातारा जिल्ह्यातही पावसाने दिवसभर दमदार हजेरी लावली.
पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील धामारी येथे ओढ्याला पूर आल्याने सातवीतील विद्यार्थिनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमरावती विभागातील सहा धरणे तसेच भंडाऱ्यातील गोसेखुर्द, चंद्रपूरमधील इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

पावसाची पर्वणी !
शुक्रवारी पहाटेपासूनच नाशिकमध्ये दिवसभर संततधार सुरूच असल्याने साधू-महंतांची शाही मिरवणूक, शाहीस्नान व भाविकांचे स्नान पावसातच पार पडले; मात्र त्यामुळे भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. एका अर्थाने सिंहस्थातील तिसरी पर्वणी पावसानेच गाजविली.

आपत्कालीन तयारी
नाशिक, पुणे येथे एनडीआरएफची हेलिकॉप्टर्स व सी-बोट्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक येथील धावपट्टीवर ३, तर पुण्यात २ हेलिकॉप्टर्स तयार ठेवण्यात आली आहेत. औरंगाबाद किंवा मराठवाड्यात मदतकार्य पोहोचण्यासाठी त्यांना ३० ते ३५ मिनिटांचा वेळ लागेल.

रब्बीला दिलासा
सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामाला त्याचा चांगला फायदा होईल. फळबागा, खरिपातील कापूस व तूर पिकांनाही या पावसाचा उपयोग होईल, असे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

मुंबई - पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडली
पुण्यातील मावळ तालुक्यात शुक्रवारी पहाटेपासून पावसाने रौद्ररूप धारण केल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग व पुणे-लोणावळा लोहमार्गावर पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. खंडाळा विभागात ७ ठिकाणी अपघात झाले़ कामशेत ते वडगाव भागात राष्ट्रीय महामार्गावर चार ते पाच फू ट पाणी साचले होते़ एकवीरा देवीच्या गडावर दोन ठिकाणी दरड कोसळली. पावसाचे पाणी पायऱ्यांवरून वाहू लागल्याने अनेक भाविक व पर्यटक अडकून पडले होते़

धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
पुण्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने शेतातील पिकेही तरारून आली आहेत. खडकवासला प्रणालीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. जुन्नर तालुक्यात नाणेघाट परिसरात काही साकव वाहून गेल्याने आठ-दहा गावांचा संपर्क तुटला आहे. मिना नदीवरील बंधाऱ्यांचे ठापे न काढल्याने नदीत आलेल्या पाण्याच्या फुगवट्यामुळे बेलसर येथील काही घरांमध्ये व मंदिरात पाणी शिरले. त्यामुळे या कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.

जायकवाडीसाठी
पाणी सोडले
नांदूरमधमेश्वरमधील जलसाठा वाढल्याने दुपारनंतर धरणातील १० हजार ७०० क्युसेस पाणी मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सोडण्यात आले. शुक्रवारी दुपारपर्यंत गंगापूर धरणात ६२ टक्केइतका साठा होता. पाऊस कोसळतच असल्याने धरणसाठ्यात मोठी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे खात्याचे अभियंता राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

विदर्भात चौघे
पुरात वाहून गेले
विदर्भात लागोपाठ दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपूरसह पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. अमरावती व भंडारा जिल्ह्यात एक आणि गोंदियात दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. अमरावतीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.

Web Title: State 'Shahi' sanan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.