राज्य मंडळाची लागणार कसोटी
By Admin | Published: June 13, 2015 02:06 AM2015-06-13T02:06:25+5:302015-06-13T02:06:25+5:30
शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार आता आॅक्टोबरऐवजी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच दहावीची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
पुणे : शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार आता आॅक्टोबरऐवजी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच दहावीची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे मंडळाला केवळ एक महिन्याचाच कालावधी मिळणार असल्याने तयारी करताना मंडळाची कसोटी लागणार आहे.
मंडळाने शुक्रवारी परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर केल्या. आॅनलाइन अर्ज व शुल्क भरून संंबंधित विभागीय मंडळांकडे माहिती देण्याची अंतिम मुदत १ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केंद्र निश्चित करणे, विद्यार्थ्यांना, बैठक क्रमांक देणे, परीक्षक, पर्यवेक्षक अशा संबंधित घटकांची नेमणूक करणे, अशी कामे मंडळाला करावी लागणार आहेत. तसेच या कालावधीतच मॉडरेटरच्या बैठका घेणे, प्रश्नपत्रिका तयार करून त्याची छपाई, उत्तरपत्रिका उपलब्ध करून देणे, यांचेही नियोजन पार पाडावे लागणार आहे.
आॅक्टोबर महिन्यात परीक्षा घेताना त्यासाठीची प्रक्रिया साधारणत: जुलै महिन्यापासूनच राबविली जात होती. त्यामुळे सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता. मात्र आता एका महिन्यातच सारे उरकावे लागणार आहे. तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्पडताळणी, पुनर्मूल्यांकनाच्या कामाचा ताणही मंडळांवर असणार आहे. त्यामुळे मंडळाची पुरती दमछाक होईल, असे चित्र आहे. महिनाभरात पेपर सेट करण्याबरोबरच, बैठक क्रमांक, केंद्रांची निवड या प्रक्रिया वेगाने कराव्या लागणार आहेत.