राज्यात अस्थमाच्या बालकांत तीन हजारांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:18 AM2019-05-07T07:18:08+5:302019-05-07T07:18:22+5:30

बदलती जीवनशैली, प्रदूषणाचा वाढता विळखा, बेसुमार वृक्षतोड, ऋतुमानातील चढउतार यामुळे अस्थमाचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.

 In the state, there are three thousand increase in asthma | राज्यात अस्थमाच्या बालकांत तीन हजारांनी वाढ

राज्यात अस्थमाच्या बालकांत तीन हजारांनी वाढ

Next

- स्नेहा मोरे
मुंबई : बदलती जीवनशैली, प्रदूषणाचा वाढता विळखा, बेसुमार वृक्षतोड, ऋतुमानातील चढउतार यामुळे अस्थमाचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. अस्थमा केवळ मोठ्यांमध्ये दिसत नसून शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्येही अस्थमा झालेल्या बालकांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक अस्थमा निवारण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अस्थमा झालेल्या बालकांची स्थिती पाहता गेल्या वर्षभरात या रुग्णांची संख्या तीन हजारांनी वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०१७- १८ साली राज्यात अस्थमा झालेल्या बालकांची संख्या ४ हजार १८५ एवढी होती. तर २०१८-१९ साली ती ७ हजार ४१७ एवढी झाली आहे. देशात सहापैकी एका बालकास अस्थमा असल्याचे आढळते. या वाढत्या प्रमाणाची स्थिती चिंताजनक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत २०१८-१९ साली २ हजार ३६८ बाल अस्थमा रुग्णांची नोंद झाली आहे, तर पुण्यात १ हजार ३१७ रुग्ण आढळले आहेत.

लहान मुलाची श्वासनलिका लहान असते. लहान मुलांमध्ये श्वसनाशी संबंधित विविध प्रकारच्या संसर्गामुळे गुणसूत्रातील दोष म्हणजेच आनुवंशिक कारणामुळे तसेच वातावरणातील घटक म्हणजे विषाणू यामुळे अस्थमा बळावण्याची दाट शक्यता असते. २०२० पर्यंत भारतात अस्थमाचे सर्वाधिक रुग्ण असण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

दरवर्षी जगात १ लाख ८० हजार अस्थमाग्रस्त मुले मृत्युमुखी पडतात. देशात सध्या दीड ते दोन कोटी लोक अस्थमाचे रुग्ण आहेत. यात ५ ते १२ वर्षांच्या मुलांमध्ये अस्थमाचे प्रमाण १० ते १५ टक्के एवढे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, लहान मुलांमध्ये अस्थमा म्हणजे दम्याचे प्रमाण सन २००८ मध्ये ५.५ टक्के इतके होते. हे प्रमाण २०१० मध्ये १० टक्क्यांपर्यंत पोहोचले. तर २०१८ मध्ये हे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक असल्याचे विविध अभ्यासातून निदर्शनास आले आहे.

असे केले जाते निदान
मुलाकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सततचा शिट्टीसारखा आवाज येत असल्यास त्याला अस्थमा म्हणजेच दमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. दमा असल्याचे निदान करण्याकरिता तपासण्या करण्याची तशी गरज नसते; परंतु काही वेळा गरज पडल्यास पल्मनरी फंक्शन टेस्ट, एक्स-रे, अ‍ॅलर्जीकरिता तपासणी, रक्ताची तपासणी करून निदान केले जाते.

योग्य उपचारांनी नियंत्रण मिळविणे शक्य
सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत अस्थमाग्रस्त लोकांची श्वसननलिका अधिक संवेदनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूर आणि धूळ यांच्या संपर्कात येताच ती आकुंचन पावते आणि श्वसन नलिकेला सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी, रुग्णाला धाप लागते. वारंवार खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येतो. ही लक्षणे औषधे घेतल्यावर तात्पुरती बरी होतात आणि काही दिवसांनी परत होतात; पण प्रत्येकाच्याच बाबतीत तो अस्थमा आहे असे नाही, यातील काही बालके ही वाढत्या वयानुसार बरी होतात. योग्य उपचार घेतल्यास हा आजार ९० टक्के नियंत्रणात आणता येतो. - डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

Web Title:  In the state, there are three thousand increase in asthma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य