राज्यात तीन महिन्यांत १६ हजार विहिरी, सिंचन क्षेत्र वाढीस मिळणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 07:07 AM2018-07-11T07:07:45+5:302018-07-11T07:08:11+5:30
मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला.
- विशाल सोनटक्के
नांदेड - मागील तीन महिन्यात नियोजनबद्ध काम केल्याने राज्यात १६ हजार १४७ विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले असून महाराष्ट्रात यवतमाळ अव्वल, तर नांदेड जिल्हा दुसरा ठरला. नांदेडमध्ये तीन महिन्यात ८८६ विहिरींचे म्हणजेच उद्दिष्टांच्या ६६.७७ टक्के काम पूर्ण झाले आहे.
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरी कार्यक्रम राबविण्यात येतो. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत या विहिरींची कामे करण्यात येतात. ३१ मार्च अखेर राज्यात ४१ हजार ६६१ विहिरींची कामे पूर्ण झाली होती तर ७६ हजार ६८९ विहिरींची कामे प्रगतीपथावर होती. प्रगतीपथावर असलेल्या विहिरींच्या कामांचा आढावा घेतला असता काही विहिरींचे काम २५ टक्के, काहींचे ५० तर काहींचे ७५ टक्के काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले होते. यावर रोहयो सचिव एकनाथ डवले यांनी अपूर्ण विहिरींच्या कारणांचा शोध घेवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणीचे निराकरण करा, अशी सूचना करीत अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे आदेश होते. यानुसार प्रगतीपथावरील ७५ टक्के काम झालेल्या विहिरी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. त्यानंतर ५० टक्के काम झालेल्या विहिरींचे काम हाती घेण्यास सांगण्यात आले होते. सदर मोहीम राज्यभरात १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत राबविण्याचे निश्चित करण्यात आले.
एप्रिल, मे आणि जून या कालावधीत राज्यभरातील अपूर्ण विहिरींच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. महिनानिहाय प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्टही देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार रोहयोच्या माध्यमातून राज्यभरात विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. एप्रिलमध्ये राज्यभरात ४ हजार ७५५ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली तर मे महिन्यात ६ हजार ३२ विहिरी पूर्ण झाल्या. जूनमध्येही विहिरींच्या पूर्णत्वाचा हा कार्यक्रम सुरूच होता. या महिन्यात ५ हजार ३६० विहिरी बांधण्यात आल्या. यानुसार मागील तीन महिन्यात राज्यात १६ हजार १४७ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले. या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्याने सर्वाधिक १ हजार ९७० म्हणजेच उद्दिष्टाच्या ८६.५२ टक्के विहिरींची कामे पूर्ण करुन राज्यात अव्वल क्रमांक पटकावला तर दुसऱ्या क्रमांकावर नांदेड जिल्हा राहिला.
कोट
सिंचन विहिरींची अपूर्ण असलेली जास्तीत जास्त कामे जूनपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य होते. यासाठी नियोजनबद्ध परिश्रम घेतल्याने जिल्ह्यात ९ जुलै पर्यंत ९६१ कामे पूर्ण करण्यात यश मिळाले. किनवट, लोहा, माहूरसह नायगाव तालुक्यात मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.
-कल्पना क्षीरसागर
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
मनरेगा, नांदेड.