मुंबईसह राज्य तापले, नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:42 AM2018-03-03T05:42:52+5:302018-03-03T05:42:52+5:30
मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असून, उष्णतेमुळे मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे.
मुंबई / माणगाव : मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसत असून, उष्णतेमुळे मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांच्या कमाल तापमानात कमालीची वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भिराचे कमाल तापमान ४२ अंशावर गेले असून, मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. बुधवारसह गुरुवारी वाढत्या कमाल तापमानासह कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर घामाघूम होत असून, उत्तरोत्तर यात आणखी वाढ होणार आहे. वातावरणातल्या या ‘ताप’दायक बदलाने संपूर्ण महाराष्ट्र तापला असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील शुक्रवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
>भिरा ४२ अंशावर : रायगड जिल्ह्यातील भिरा येथे शुक्रवारी सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्च २०१७ मध्ये रायगड जिल्ह्यातील भिरा येथे नोंद करण्यात आलेल्या ४६.५ अंश सेल्सिअस अशा देशातील उच्चतम तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुरुवारी येथील तापमान ४०.५ सेल्सिअस होते. शुक्रवारी ते ४० अंश सेल्सिअस इतके होते. तर, मंगळवारी भिरा येथे सर्वाधिक अशा ४२ अंश सेल्सिअस झाल्याची माहिती मुंबई येथील मेट्रॉलॉजिकल विभागाने दिली आहे. यापूर्वी २७ एप्रिल २००५ रोजी भिरा येथे गेल्या १३ वर्षांतील सर्वाधिक अशा ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.