सुकाणू समितीचा आजपासून राज्यव्यापी जनजागरण दौरा
By admin | Published: July 10, 2017 04:50 AM2017-07-10T04:50:20+5:302017-07-10T04:50:20+5:30
जनजागरण दौऱ्यास सोमवारी नाशिक येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले (जि. अहमदनगर) : संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या राज्यव्यापी जनजागरण दौऱ्यास सोमवारी नाशिक येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.
शेतकरी प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून सुकाणू समितीतर्फे राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरू करण्यात येत आहे. सोमवारी नाशिक येथे एल्गार सभा घेऊन जागृती यात्रेची सुरुवात होणार आहे. सुकाणू समितीमध्ये सहभागी सर्व प्रमुख संघटना जनजागरणात सामील होत आहेत. प्रमुख १४ ठिकाणी जाहीर सभा होतील. सरकारने कर्जमाफी संदर्भात केलेल्या फसवणुकीविरोधात जनजागरण केले जाणार असून लढ्याची दिशा त्यातून निश्चित केली जाणार आहे. कर्जमाफीसाठी दीड लाखाची मर्यादा लावण्यात आली आहे. थकीतसाठी ३० जून २०१७ ची अट घालण्यात आली आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत, यासाठी त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्याची नितांत गरज आहे, अशी समितीची भूमिका आहे.