राज्याला मिळणार ‘रेलटेल’ची मदत
By admin | Published: April 9, 2016 03:41 AM2016-04-09T03:41:16+5:302016-04-09T03:41:16+5:30
तपास यंत्रणेसमोर आव्हान उभे केलेल्या सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी भारतीय रेल्वेचे रेलटेल कॉर्पोरेशन हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाला सहकार्य करणार आहे
यदु जोशी, मुंबई
तपास यंत्रणेसमोर आव्हान उभे केलेल्या सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी भारतीय रेल्वेचे रेलटेल कॉर्पोरेशन हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाला सहकार्य करणार आहे. मुंबईसह चार शहरांमधील रेल्वे स्थानकांवर असलेले सीसीटीव्ही नेटवर्क स्थानिक पोलीस ठाण्यांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहे.
रेलटेलचे देशभरात ४५ हजार रुटकिलोमीटरचे (आरकेएमएस) फायबर आॅप्टिकचे नेटवर्क असून, त्याद्वारे ४ हजार ५०० शहरे / गावे जोडली गेली आहेत. राज्य पोलिसांचे सायबर गुन्हे रोखण्यासाठीचे नेटवर्क गतिमान होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. भारतीय रेल्वे बोर्डचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांच्यात अलीकडे दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रेलटेलच्या सहकार्यामुळे राज्यातील दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठीचे बँडविथ सायबर सेलला मिळणार असल्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला मोठी गती मिळेल. तसेच सोशल मीडियावरही नजर ठेवता येईल. अनेकदा सोशल मीडियाचा वापर सामाजिक सौहार्द बिघडविण्यासाठी केल्याचीही उदाहरणे आहेत. रेलटेलच्या सहकार्याने सायबर सेलला दर्जेदार इंटरनेट नेटवर्क मिळेल. आज इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नाही अशा ठिकाणीही त्यामुळे पोहोचता येईल.
याशिवाय, राज्याच्या सायबर प्रकल्प विकासासाठी सीडॅकचे सहकार्य देण्यास केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांचा बीमोड करण्याचा संकल्प २०१४मध्ये व्हिजन डॉक्युमेंटमध्ये केला होता. त्याला मूर्त रूप देण्यासाठी आता पावले उचलली जात आहेत. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात मंत्रालयामध्ये विशेष विभागही स्थापन करण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून दहशतवाद्यांकडून होणारा इंटरनेटचा वापर, आॅनलाइन आर्थिक घोटाळे, सोशल मीडियाचा वापर याबाबत हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.