Maharashtra Politics: संजय शिरसाट यांच्यावर काय कारवाई करण्यात आली? रुपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितले, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 01:40 PM2023-03-31T13:40:59+5:302023-03-31T13:41:29+5:30
Maharashtra Politics: तेव्हा आपल्याला समजेल की, पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
Maharashtra Politics: ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. यातच शिंदे गटातील नेते आणि आमदार यांनी केलेल्या टीकेप्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीचे पुढे काय झाले, संजय शिरसाट यांच्यावर काय करवाई झाली, असा प्रश्न राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आला होता.
हे माझे भाऊ आहेत. ते माझे भाऊ आहेत. असे म्हणणाऱ्या त्या बाईने काय लफडी केलीत ते तिलाच माहिती. आम्ही ३८ वर्षे शिवसेनेत घालवली. तुम्ही कोण, तुम्ही आता आम्हाला मार्गदर्शन करणार का, असा करत संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर संजय शिरसाट यांनी याबाबतचे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र, संजय शिरसाट यांनी केलेल्या टीकेवरून सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली होती.
संजय शिरसाट यांना सदर विधान भोवण्याची चिन्हे
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेले वक्तव्य आता त्यांना भोवणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारले असता, सुषमा अंधारे यांची तक्रार राज्य महिला आयोगाला मिळाली. त्यानंतर आयोगाने संभाजीनगर पोलीस आयुक्तांना यासबंधी चौकशी करून कारवाई करण्याची आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महिला आयोगाने दिल्या आहेत. हा अहवाल ४८ तासांमध्ये सादर करण्यास सांगतले होते. उद्या तो कालावधी संपेल. तेव्हा आपल्याला समजेल की, पोलिसांनी याप्रकरणी काय कारवाई केली आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"