वडवलीप्रकरणी २५ जणांच्या जबाबानंतरही गूढ कायम
By admin | Published: March 4, 2016 03:35 AM2016-03-04T03:35:24+5:302016-03-04T03:35:24+5:30
वडवलीतील भीषण हत्याकांड घडवणाऱ्या हसनैन वरेकरने हे कृत्य का केले, याबाबतचा तपास करण्याकरिता पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवले आहेत
जितेंद्र कालेकर, ठाणे
वडवलीतील भीषण हत्याकांड घडवणाऱ्या हसनैन वरेकरने हे कृत्य का केले, याबाबतचा तपास करण्याकरिता पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, अद्याप पोलिसांना हत्याकांडाचे नेमके कारण शोधून काढण्यात यश आलेले नाही. आता हसनैनचे यापूर्वी काही गुन्हेगारी रेकॉर्ड होते किंवा कसे, याचाही तपास सुरू झाला आहे.
हसनैनची बहीण व हत्याकांडाची एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार सुबियाने रविवारी पहाटे ३ वा.च्या सुमारास आरडाओरडा केला तेव्हा तिच्या मदतीसाठी धावून आलेला तिचा चुलत भाऊ अल्तमेश वरेकर याचीही जबानी महत्त्वाची मानली जात आहे. मंगळवार आणि बुधवारी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. सुबियाने धावा केल्यावर तुम्ही किती वाजता वरेकरांच्या घराकडे धाव घेतली? खिडकी तोडण्यासाठी लोखंडी पहारीचा कसा वापर केला, इथपासून हसनैनच्या स्वभावापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे या जबाबात नोंदविण्यात आली.
अल्तमेशची आई हसनैनची चाची शाहिस्ता वडेकर तसेच मामा अयाज वडेकर, मुजीब वडेकर आणि काका जईद आदी नातेवाइकांसह २० ते २५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अर्थात, या सर्व जबाबांमधून विशेष काही पोलिसांच्या हाती लागले नसल्याचेही समजते.
गेल्या पाच दिवसांपासून सर्व बाजूंनी तपास सुरू असला तरी स्पष्ट दिशा सापडत नसल्याने हसनैनच्या विरुद्ध कोकण, ठाणे शहर व ग्रामीण, नवी मुंबई आणि मुंबई या पोलीस आयुक्तालयात कुठल्याही स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी दाखल झाले आहेत किंवा कसे, याचाही आढावा पोलीस घेत आहेत.
हसनैनने हे हत्याकांड करण्यामागे अंधश्रद्धा किंवा एखाद्या जहाल
गटाची प्रेरणा आहे किंवा कसे,
हे तपासण्याकरिता त्याने कोणकोणत्या दर्ग्यांना भेटी दिल्या, याची खातरजमा करण्याकरिता त्याच्या मोबाइलचे गेल्या महिनाभरातील टॉवर लोकेशन्स तपासण्यात येत आहे. तसेच महिनाभरात तो कुुटुंब, मित्र याखेरीज अन्य कुणाकुणाच्या संपर्कात होता, याचीही चाचपणी सुरू झाली आहे.