वक्तव्य भोवले, महाधिवक्ता श्रीहरी अणेंचा राजीनामा

By Admin | Published: March 22, 2016 10:35 AM2016-03-22T10:35:26+5:302016-03-22T11:48:20+5:30

स्वतंत्र मराठवाड्याचे समर्थन करणारे वक्तव्य श्रीहरी अणेंना भोवले असून आज सकाळी त्यांनी राज्यपालांकडे पदाचा राजीनामा सोपवला

Statement of Bhavle, Advocate General, Mr.Hari Anne resigns | वक्तव्य भोवले, महाधिवक्ता श्रीहरी अणेंचा राजीनामा

वक्तव्य भोवले, महाधिवक्ता श्रीहरी अणेंचा राजीनामा

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - विदर्भासह स्वतंत्र मराठवाड्याचे समर्थन करणारे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना भलतेच महागात पडले असून मंगळवारी सकाळी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 
मंगळवारी सकाळी अणेंनी प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यानंतर १०.३० च्या सुमारास राजभवनात जाऊन राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. थोड्याच वेळाने राज्यपाल राव यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. स्वतंत्र विदर्भ व मराठवाड्याच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात उमटलेले पडसाद आणि आपल्याविरोधात तयार झालेल्या वातावरणासमोर झुकून, तसेच आपल्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी अणेंनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शिवसेना मात्र अणेंच्या केवळ राजीनाम्याने समाधानी नसून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत शिवसेना नेत्यांनी विधानभवनाच्या पाय-यांवर निदर्शने केली.

अणे यांनी रविवारी जालना येथे स्वतंत्र मराठवाडा राज्याचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते.  विदर्भापेक्षा मराठवाड्यावर अधिक अन्याय झाल्याचे सांगत वेगळ्या मराठवाडयाची मागणी योग्य आहे, असे अणे यांनी म्हटले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून सोमवारी राज्यातील वातावरण भलतेच तापले, त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. अ‍ॅड. अणे यांनी राजीनामा द्यावा, ते राजीनामा देत नसतील तर सरकारने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधकांसह शिवसेना व भाजपाच्याही काही सदस्यांनी लावून धरत सभागृहात जोरदार नारेबाजी केली होती.

अणेंच्या या वक्तव्यावरून सरकारचीही चांगलीच कोंडी झाली. अणे यांच्या या वक्तव्याच्या निषेध करीत त्यांना तत्काळ या पदावरून मुक्त करावे, असा प्रस्ताव काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेकाप यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. तर शिवसेनेही याच मागणीसंदर्भात स्वतंंत्र प्रस्ताव देत दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. विधान परिषदेत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अणेंची हकालपट्टी होईपर्यंत शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठीला जाणार नाही, असा इशारा दिला. महाराष्ट्राविरुद्ध आग ओकणाऱ्या अणे यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही त्यांनी केली. तर विधानसभेत प्रताप सरनाईक यांनी अणेंवर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला. अणे हे राज्याचे तुकडे करू पाहणारे महाराष्ट्रातील ओवेसी आहेत, असे टीकास्त्र सोडत त्यांचे निलंबन होईपर्यंत आपण सभागृहात आसनावर बसणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. विरोधकांनी अणे यांच्यावरून सरकारची कोंडी केलेली असतानाच शिवसेनेच्या भूमिकेमुळे सरकारपुढे चांगलाच पेच निर्माण झाला.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही अणे यांचा मुद्दा गाजला होता. त्यावेळी विदर्भाबाबत अणे यांचे वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक मते असून सरकारशी त्याचा संबंध नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला होता. मात्र या अधिवेशनातही अणेंच्या वक्तव्याने वातावरण तापले आणि अखेर त्यांना हे पदच गमवावे लागले. 

 

 

Web Title: Statement of Bhavle, Advocate General, Mr.Hari Anne resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.