‘त्या’ वक्तव्याचा त्रास झाला - आमीर खान

By admin | Published: April 4, 2016 03:28 AM2016-04-04T03:28:31+5:302016-04-04T03:28:31+5:30

मी असहिष्णुतेबद्दल केलेले वक्तव्य प्रसारमाध्यमांनी चुकीच्या पद्धतीने सादर केले. त्यामुळे केवळ मीच नाही, तर माझ्या जवळची माणसेही निराश झाली. त्यांच्या भावनाही दुखावल्या गेल्या

'That statement got troubled - Aamir Khan | ‘त्या’ वक्तव्याचा त्रास झाला - आमीर खान

‘त्या’ वक्तव्याचा त्रास झाला - आमीर खान

Next

मुंबई : मी असहिष्णुतेबद्दल केलेले वक्तव्य प्रसारमाध्यमांनी चुकीच्या पद्धतीने सादर केले. त्यामुळे केवळ मीच नाही, तर माझ्या जवळची माणसेही निराश झाली. त्यांच्या भावनाही दुखावल्या गेल्या. माझी आई, बायको, मुले, बहीण, भाऊ ही सगळी माझ्या जवळची माणसं या सगळ्या प्रकरणात होरपळली. त्या काळात एका वेगळ्याच मानसिकतेतून जावे लागले. पण त्याचवेळी अनेकांनी धीर दिल्याने बळही मिळाले, अशा शब्दांत अभिनेता आमीर खान याने आपले मन मोकळे केले. ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या भव्य सोहळ्यात ‘लोकमत’चे संपादकीय आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी ‘मि. परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेल्या आमीरला चित्रपटांपासून वैयक्तिक आयुष्यातील प्रसंगांवर बोलते करीत त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडले. तुझी यशाची संकल्पना काय?
यश मिळविण्याच्या ध्येयाने मी कोणतेही काम करीत नाही. याउलट हाती घेतलेल्या कामात झोकून देत संपूर्ण मेहनतीने मन लावून ते काम करतो. त्यामुळे यश मिळेल की नाही, हा विचार करून आजवर मी कोणतेच काम निवडले नाही; आणि भविष्यातही निवडणार नाही, कारण तुम्ही मनापासून एकाग्र होऊन एखाद्या कामासाठी वेळ दिला की यश मिळतेच! एखादवेळी अपयश पदरी आले तरी त्यातूनही शिकायची संधी मिळतेच. त्यामुळे सतत काम करीत राहणे यावरच माझा विश्वास आहे.
‘मि. परफेक्शनिस्ट’ ही ओळख
टिकविण्यासाठी काय करता?
खरं म्हणजे तसं कोणीच परफेक्ट नसतं. मी वर्किंग पॅशिनेट आहे. मी निवडलेले काम पूर्ण ताकदीने आणि झोकून देऊन करायला आवडते. कामाच्या काळात मी वेगळ्याच विश्वात असतो. त्यामुळे ध्येयवेड्यासारखा मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा वापर करून निवडलेले काम पूर्णत्वास नेतो.
तुम्ही सनी लिओनसोबत फिल्म साईन
केल्याची सध्या बरीच चर्चा आहे?
नाही! मी अभिनेत्री सनी लिओनसोबत
कोणतीही फिल्म साईन केली नाही. पण योग्य
संहिता आल्यास मला काम करायला आवडेल. सध्या मी केवळ दोन प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्यात लवकरच प्रदर्शित होणारा प्रसिद्ध कुस्तीपट्टू महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित ‘दंगल’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तसेच, महाराष्ट्रातील पाणीप्रश्नावर ‘पानी’ फाउंडेशनअंतर्गत काम सुरू आहे. पाण्याची सद्य:स्थिती, पाण्याचे नियोजन, साठा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम सुरू आहे. याकरिता, ‘सत्यमेव जयते’ची चमूही या कामात सहभागी होऊन मदत करतेय.
सोशल मीडियाबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
सोशल मीडियावर बऱ्याचदा काहीही बोलले जाते. याला ठोस पुरावा नसतो. सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या बऱ्याच गोष्टींमागे ‘मॉब सायकोलॉजी’ असते. ज्याप्रमाणे गर्दीतून कुणी आवाज दिला की, नेमके कोण बोलले हे कळत नाही. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर जे काही शेअर होते, ते नेमके कोण करते याविषयी कळत नाही. मात्र सोशल मीडियाचा दिवसेंदिवस होणारा विस्तार पाहता या व्यासपीठाचा सकारात्मक वापर होणे गरजेचे आहे.
बऱ्याचदा, तुम्ही एकटेच फिरायला जाता, हे खरंय का?
होय... मला सामान्य माणसांसारखं जगायला आवडतं. एकटं राहायलाही आवडतं. त्यामुळे त्या काळात माझ्यासोबत सुरक्षारक्षकही नसतात. त्यामुळे मागच्या काही दिवसांत मी अ‍ॅमस्टरडॅम आणि अर्जेंटिनाला एकटाच फिरण्यासाठी गेलो होतो. तेथे मी सायकलिंग केले आणि टँगो डान्सचेही धडे गिरविले. या सगळ््या प्रवासात मी स्वत:चं माझे सामान उचलतो, टॅक्सी पकडतो, चेक इन करतो. त्या प्रवासात वेगवेगळ््या ठिकाणांना भेटी देतो. निरनिराळ््या स्वभावाची माणसंही तेव्हा भेटतात. या प्रवासादरम्यान माझं अनुभवविश्व समृद्ध होतं.
आजपर्यंत वेगवेगळ््या प्रकारच्या भूमिका केल्या, पण राजकीय नेत्याची भूमिका केली नाही, का?
- असे काही नाही, पण आजवर तशी संहिता माझ्याकडे आली नाही. राजकीय नेत्याची भूमिका करायची झाल्यास ठरावीक राजकीय नेत्याचा अभ्यास, निरीक्षण करणे चुकीचे ठरेल. कारण एखाद्या भूमिकेचे पात्र आणि त्याचे क्षेत्र (व्यवसाय) या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे संहितेच्या गरजेप्रमाणे त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करून भूमिका केली जाते. शिवाय, एखादा चित्रपट यशस्वी होण्यामागे केवळ अभिनेत्याचे योगदान नसते. चित्रपट यशस्वी होण्यामागे लेखक आणि दिग्दर्शकाचे सर्वात महत्त्वाचे योगदान असते. अभिनेता हा सर्वांत अखेरीस या चित्रपटाशी जोडतो आणि दिग्दर्शक, लेखकाने दिलेले काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवितो.
(चित्रपटात राजकारणी व्यक्तीला नेहमी व्हिलन दाखवले जाते, म्हणून नसेल कदाचित! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा पिकला.)
आता तुम्हाला स्वत:मध्ये काही बदल करावेसे वाटतात का?
ज्या व्यक्तींवर मी प्रेम करतो, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावासा वाटतो, पण बऱ्याचदा ती संधी मिळत नाही. कारण मी माझ्याच विश्वात हरवून गेलेलो असतो, पण आता मला ही जाणीव झालीय की, ‘माझ्याकडे कायम वेळ होता, पण मीच त्याची निवड केली नाही’. मी माझ्या कामाला प्राधान्य दिले आणि त्यामुळे जवळच्या व्यक्तींना त्रास झाला, त्यांच्या वाट्याला दु:ख आले की, मी नक्की त्यांची साथ देईन, असा विचार करायचो, पण आता परिस्थिती बदलली आहे. केवळ दु:खातच का सोबत द्यायची? ही माझी माणसे आहेत, त्यांना वेळ द्यायलाच पाहिजे, असा निश्चय केला आहे. त्यामुळे आता सोमवारपासून मी आझादला शाळेत सोडायलाही जाणार आहे. आज ‘एप्रिलफूल’ असले, तरी माझ्या निश्चयावर मी ठाम आहे. स्वत:मध्ये बदल घडविण्याची हीच योग्य वेळ आहे.
> टी-२०च्या सेमिफायनल्सच्या वेळी नेमकं मनात काय सुरू होतं?
सिमन्सची धुवाधार खेळी सुरू असताना टेन्शनमुळे मी नीता अंबानी यांना ‘काहीतरी कर’ असा मेसेजही केला होता. पण त्या वेळी सिमन्स नशीब घेऊन आला होता, त्याची वेळ होती. यात विशेष बाब अशी की, भारताचा संघ एका दमदार संघासोबत अटीतटीची लढत देऊन हरला. सिमन्सने भारताला उपांत्य फेरीत हरविले तोच सिमन्स नीता अंबानींच्या मुंबई इंडियन्समध्ये आहे.. असा तिरकस प्रश्न ऋषी दर्डा यांनी केला आणि सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

Web Title: 'That statement got troubled - Aamir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.