विधान परिषदेत लेखानुदानाचा तिढा
By admin | Published: March 25, 2017 02:35 AM2017-03-25T02:35:01+5:302017-03-25T02:35:01+5:30
विधानसभेत संख्याबळाच्या जोरावर आणि विरोधकांच्या अनुपस्थितीत राज्य सरकारने लेखानुदान मंजूर करून घेतले असले तरी
मुंबई : विधानसभेत संख्याबळाच्या जोरावर आणि विरोधकांच्या अनुपस्थितीत राज्य सरकारने लेखानुदान मंजूर करून घेतले असले तरी विधान परिषदेत मात्र लटकले आहे. त्यामुळे याप्रकरणी हस्तक्षेप करून विनियोजन विधेयक मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्य सरकार राज्यपालांकडे करणार आहे.
विधान परिषदेत विरोधकांची संख्या जास्त असल्यामुळे तिथे काल व आजही लेखानुदान मांडता आले नाही. सभापतींनी कामकाज पुकारण्याच्या आधीच अवघ्या काही मिनिटातच परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
३१ मार्चपर्यंत विधान परिषदेने लेखानुदान मंजूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्या शनिवारच्या कामकाजात लेखानुदान विधेयक संमत करावे, असे पत्र संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभापतींना लिहिले आहे. तसेच याप्रश्नी उद्या राज्यपालांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)