श्रीहरी अणेंच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ

By admin | Published: March 21, 2016 05:32 PM2016-03-21T17:32:27+5:302016-03-21T18:04:56+5:30

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भापाठोपाठ मराठवाडाही स्वतंत्र करण्याची मागणी केल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी सोमवारी विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले.

The statement of Mr. Shahriar Shankar | श्रीहरी अणेंच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ

श्रीहरी अणेंच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ

Next

- हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधकांची घोषणाबाजी.
- सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब.

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भापाठोपाठ मराठवाडाही स्वतंत्र करण्याची मागणी केल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी सोमवारी विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले. महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या अणेंची हकालपट्टी होईपर्यंत सभागृहाचे चालू देणार नाही, असे सांगत विरोधकांनी कामकाज रोखून धरल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
सोमवारी सभागृहाचे नियमित कामकाज भरताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे श्रीहरी अणेंच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा उपस्थित केला. मुंडे म्हणाले की, यापुर्वी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला अणेंनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. आता तर विदर्भासोबत वेगळ्या मराठवाड्याची मागणी केली आहे. उद्या ते वेगळा खान्देश करा, मुंबई वेगळी करा अशी मागणी करतील. त्यामुळे अणे यांनी महाधिवक्तापदाववरुन हकालपट्टी करावी. महाधिवक्तयाची मते वैयक्तिक मानता येणार नाहीत असे संगत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. मुंडे यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला काँग्रेस सदस्य संजय दत्त, शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील, लोकभारतीची कपिल पाटील, राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी पाठिंबा देत अणेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
विरोधकांच्या घोषणाबाजीत संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. स्थगन प्रस्ताव नाकारला असतानाही विरोधी बाकांवरील सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली. आम्ही त्यांची सगळ्यांची भाषणे ऐकली. आता तुम्हीही ऐकायला हवे, असे बापट म्हणाले. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरुच ठेवल्याने सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली. सभागृह एक वाजता परत सुरु झाल्यावरही विरोधी सदस्यांनी सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे तालिका सभापती मुझफ्फर हुसैन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.

महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे वकीलपत्र घेतले आहे का - संजय दत्त
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे वकीलपत्र घेतले आहे का. विधिमंडळाचे अधिवेशन चालू असतानाच अणे अशी वक्तवे का करतात याचा तपास करायला हवा. विदर्भानंतर आता मराठवाडा वेगळा करण्याची मागणी अणे यांनी केली. उद्या पुण्यात जातील आणि पश्चिम महाराष्ट्र स्वतंत्र करा म्हणतील, तसेच वेगळा कोकणही मागतील. ज्यांच्यावर राज्याची भूमिका मांडण्याची जबाबदारी आहे ते महाधिवक्ताच सरकारवर टीका करतात. राज्याचे तुकडे करण्याची मागणी करतात. मेक इन इंडियाच्या घोषणा करणारे सध्या ब्रेक इन महाराष्ट्राची भूमिका मांडत आहे.

मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी- शरद रणपिसे
महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे अणे यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारची भूमिका मांडावी.

अणेंचा सोक्षमोक्ष लावा- जयंत पाटील
बेळगाव, कारवार, निपाणीचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच राज्याचे महाधिवक्ता महाराष्ट्र तोडण्याची भाषा करीत आहेत. ही बाब धोकदायक आहे. आजपर्यंत वेगळ्या मराठवाड्याची कोणी मागणी केली नव्हती. अणे यांनी जाणूनबुजून विदर्भ आणि मराठवाडा स्वतंत्र करण्याची मागणी केली आहे. हे अणे कधी सरकारवरच ताशेरे ओढतात तर कधी विधिमंडळातील सदस्यांबद्दल वादग्रस्त विधान करतात. त्यामुळे अणे यांची हकालपट्टी करुन एकदाच सोक्षमोक्ष लावा.

अणेंवर राजद्रोहाचा खटला भरा - कपिल पाटील
राज्याचे तुकडे करण्याची श्रीहरी अणे यांची मागणी सरळसरळ राजद्रोहाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांची महाधिवक्ता पदावरुन हकालपट्टी करावी आणि राजद्रोहाचा खटला भरावा.

तोर्पयत सभागृह चालू देणार नाही - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
महाधिवक्ता या पदावर असताना अशा प्रकारची वक्तव्ये करणो योग्य नाही. श्रीहरी अणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पदावरून हटवावे. यासंदर्भात आम्ही सर्वानी विधानसभा अध्यक्षांकडे ठराव पाठविला आहे. जर मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ निर्णय घेतला नाही तर आम्ही सभागृह चालू देणार नाही. 
 
अणेंचा बोलविता धनी कोण? - जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
राज्याचा महाधिवक्ताच राज्य तोडण्याची भाषा करत असेल तर ही गंभीर बाब आहे. महाधिवक्ता श्रीहरी अणेंना कोणाचा पाठींबा आहे समोर आले पाहिजे. अणो सहजासहजी अशी भूमिका मांडू शकत नाहीत, हे सामथ्र्य कुठून येतंय, त्यांचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. मराठवाडय़ात दुष्काळाची फार मोठी समस्या असून यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशी वक्तव्ये होत आहेत. जोपर्यंत श्रीहरी अणे यांचे निलंबन होत नाही तोर्पयत विधानसभा चालणार नाही. 
 
देशात ओवेसी आणि राज्यात अणे -  प्रताप सरनाईक, शिवसेना आमदार
एमआयएमचे ओवेसी ज्याप्रमाणो देशभर वादग्रस्त वक्तव्ये करतात तसे महाधिवक्ता श्रीहरी अणे राज्यात वक्तव्ये करत आहेत. हिवाळी अधिवेशनापुर्वी त्यांनी स्वतंत्र विदर्भाचा पुनरुच्चर केला. आता तर ते वेगळा मराठवाडाही मागतायत. अणे यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, त्यासाठी विधानसभेत हक्कभंग आणू. विधिमंडळ सदस्यांसमोर अणे यांनी भूमिका स्पष्ट  करावी. अणो यांच्या वक्तव्यामागे सरकारचा छुपा अजेंडा आहे का, याचा खुलासा राज्य सरकारने करायला हवा. 
 
तर शिवसेना रस्त्यावर उतरेल - रामदास कदम, शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री 
श्रीहरी अणे हे महाधिवक्ता पदासाठी लायक नाहीत, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यांच्यामुळे पदाची प्रतिष्ठा कमी होत आहे.  अणो यांची जेंव्हा निवड झाली तेंव्हाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत विरोध दर्शविण्यास सांगितले होते. नालायक माणूस आहे हे मुख्यमंत्र्यांना सांगायला सांगितले होते. त्यांचे म्हणणो आता खरे ठरत आहे. 
अणो यांनी काल पुन्हा एकदा विष ओकलं आहे. त्यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून निलंबित करण्याची मागणी करणार आहे. त्यांची हकालपट्टी झाली नाही तर शिवसेना भविष्यात रस्त्यावर उतरेल. 
 
चार आणेंची तरी अक्कल आहे का? -  नितेश राणे, काँग्रेस आमदार
सतत महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणा-या अणेंना चार आणेची तरी अक्कल आहे का, हा प्रश्न पडला आहे. त्यांच्या शरीरापासून डोकं वेगळ केले तर मग यांना कळेल महाराष्ट्राला तोडणे काय असते. 
 
सभागृह चालू देणार नाही - जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीहरी अणे यांची वारंवार येणारी विधाने ही भाजपाने दिलेली सुपारी आहे. आणे-चाराणे यांनी महाराष्ट्राच्या बंद्या रुपयाबद्दल काय बोलावं यावर मतदान घ्यायला हवे. जोर्पयत असे मतदान होत नाही तोर्पयत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही.

Web Title: The statement of Mr. Shahriar Shankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.