मराठवाडाही स्वतंत्र व्हावा, श्रीहरी अणेंचे वक्तव्य
By admin | Published: March 21, 2016 03:35 AM2016-03-21T03:35:43+5:302016-03-21T03:35:43+5:30
मराठवाडा व विदर्भाचे दु:ख सारखेच आहे. उलट मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झाला. त्यामुळे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र व्हावा
जालना : मराठवाडा व विदर्भाचे दु:ख सारखेच आहे. उलट मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झाला. त्यामुळे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र व्हावा, असे मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी जालना येथे व्यक्त केले.
मराठवाडा राज्य निर्मितीसाठी स्थापन झालेल्या मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना अणे यांच्या हस्ते साडी-चोळीचे वाटप करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राज्यनिर्मितीचा निर्णय केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविषयी मराठवाड्याच्या जनतेने गैरसमज करून घेऊ नये,
असे सांगत येथील जनतेने
व्यापक लढा उभारावा, असे आवाहनही अणे यांनी केले.
ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच म्हटले होते की, महाराष्ट्राची तीन राज्ये आहेत. त्यांना एकाच नकाशात कोंबले, तर विदर्भ आणि मराठवाड्यावर मोठा अन्याय होईल. आंबेडकरांचे ते भाकित आज खरे ठरत आहे. मी जशी विदर्भाची बाजू मांडली. त्याचप्रमाणे, मराठवाड्याचीही बाजू मांडण्यास तयार आहे. कुठल्याही राजकीय पक्षांना विदर्भ वा मराठवाडा स्वतंत्र व्हावा, असे वाटत नसते. कारण त्यांना फक्त मुंबईवर राज्य
करायचे असते,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (प्रतिनिधी)
१०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर मिळालेल्या महाराष्ट्र राज्याचे तुकडे पाडू इच्छिणारे अणे यांची महाधिवक्ता पदावरून उचलबांगडी करावी.
- खा. अरविंद सावंत, शिवसेना