राज्याचा अर्थसंकल्प 27 फेब्रुवारीला सादर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:32 PM2019-02-05T17:32:45+5:302019-02-05T17:40:33+5:30
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 27 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 27 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडणार आहेत.
25 फेब्रुवारी ते 2 मार्च असा या राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. मंगळवारी सायंकाळी विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीवर अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढविण्यात आला आहे. राज्यातील भीषण दुष्काळावर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार याची उत्सुकता आहे.