संरक्षण गुंतवणूकवाढीसाठी राज्याचे स्वतंत्र धोरण
By admin | Published: March 5, 2017 02:15 AM2017-03-05T02:15:02+5:302017-03-05T02:15:02+5:30
संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीस चालना मिळण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याद्वारे ५ बिलियन डॉलर
मुंबई : संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीस चालना मिळण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याद्वारे ५ बिलियन डॉलर (सुमारे ३३ हजार ५०० कोटी रुपये) गुंतवणूक होणार असून, १ लाख रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.
हॉटेल ट्रायडेंट येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने ‘डिफेन्स अँड एरोस्पेस मेक विथ महाराष्ट्र’ या विषयावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत परिषद झाली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मेक इंडिया मोहिमेंतर्गत संरक्षण क्षेत्रातील जागतिक कंपन्या भारतात गुंतवणूक करू पाहात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातदेखील संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील जागतिक कंपन्यांनी गुंतवणूक करावी. त्यासाठी शनिवारी झालेल्या परिषदेत राज्याने तयार केलेले स्वतंत्र धोरण जागतिक कंपन्यांसमोर मांडण्यात आले. त्याचे स्वागत करण्यात आले असून, काही सूचना या कंपन्यांमार्फत करण्यात आल्या असून, त्याचा समावेश धोरणात करण्यात येईल.’
राज्य शासन उभारणार एक हजार कोटींचा फंड
फडणवीस म्हणाले की, या क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांची गरज लक्षात घेऊन धोरण तयार करण्यात आले आहे.
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना साहाय्य म्हणून राज्य शासन एक हजार कोटी रुपयांचा फंड उभारणार आहे. त्याशिवाय अन्य सवलतीदेखील देण्यात येतील.
संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, संरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव सुरिन रंजन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, तसेच भारत फोर्जचे बाबा कल्याणी यांच्यासह देशविदेशातील हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्रातील उद्योजक, स्वीडन, फ्रान्स, रशिया, अमेरिका, ब्रिटन आदी विविध देशांचे वाणिज्य दूत उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
मेक विथ महाराष्ट्र - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी अतिशय सुयोग्य वातावरण व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. उद्योगांसाठी स्नेहपूर्ण वातावरण, विविध प्रोत्साहनपर योजना, वाद निवारणासाठी आंतरराष्ट्रीय वाद निवारण केंद्राची स्थापना, कुशल मनुष्यबळ, यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठीचे सर्वोत्तम ठिकाण आहे. संरक्षण व हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्राच्या उद्योगांसाठीही विशेष धोरणांतर्गत सवलती देण्यात येणार आहेत.
राज्यात २५ टक्के उत्पादन
संरक्षण क्षेत्रातील २५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. परिषदेमध्ये जागतिक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीस सकारात्मकता दर्शवली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्राला प्राधान्य - पर्रीकर
महाराष्ट्रात संरक्षणाशी संबंधित अनेक संस्था, तसेच खासगी उद्योग आहेत.येथे कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम आहे. संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांना सुरक्षित वातावरण मिळत असल्याने, महाराष्ट्र हे लवकरच संरक्षण व हवाई संरक्षण उत्पादन निर्मितीचे हब बनेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.