राज्याचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच
By Admin | Published: December 14, 2015 12:31 AM2015-12-14T00:31:22+5:302015-12-14T00:31:22+5:30
राज्यात काही भाग वगळता किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असून पुढील चार-पाच दिवस त्यात बदल होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सध्यातरी कडाक्याची थंडी जाणवणार नाही
पुणे : राज्यात काही भाग वगळता किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असून पुढील चार-पाच दिवस त्यात बदल होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सध्यातरी कडाक्याची थंडी जाणवणार नाही. दरम्यान, रविवारी राज्यात नाशिक येथे सर्वात कमी किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
नैर्ऋत्य अरबी समुद्र व लगतच्या भागावर असलेला कमी दाबाचा पट्टा अद्याप कायम आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असून थंडी कमी झाली आहे. पुढील दोन-तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात कोकणच्या काही भागात तापमानात सरासरीच्या किंचित घट झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्याचा काही भाग वगळता पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
रविवारी राज्यात नाशिक येथे सर्वात कमी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल जळगाव येथे १३.४ अंश तर नांदेड येथे १४.५ अंश सेल्सिअस किमान तापमाना होते. उत्तर भारतात राजस्थान, हरियाणा या राज्यांत थंडीची लाट असून पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच या भागात दाट धुके पडत असून, ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
राज्याच्या प्रमुख शहरांचे किमान तापमान
मुंबई (कुलाबा) २१.५
सांताक्रुझ १७.२
अलिबाग २०.१
रत्नागिरी १९.५
डहाणू १७.६
पुणे १५.६
अहमदनगर १५.६
कोल्हापूर १९.६
महाबळेश्वर १७
मालेगाव १५.४
सांगली १९.६
सातारा १५.८ सोलापूर २१.४
औरंगाबाद १६.५
परभणी १८.१
अकोला १६.५
अमरावती १७.४
बुलडाणा १६.८
चंद्रपूर १९
गोंदिया २०.६
नागपूर १६.५
वाशिम १७.२
वर्धा १८
यवतमाळ १८.४.