गुन्हेगारीमुळे राज्याची बदनामी
By admin | Published: April 24, 2017 03:25 AM2017-04-24T03:25:53+5:302017-04-24T03:25:53+5:30
गुन्हेगारीत नागपूर देशात अव्वल स्थानी पोहचले असून यामुळे राज्याची बदनामी होत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत केला.
शिर्डी : गुन्हेगारीत नागपूर देशात अव्वल स्थानी पोहचले असून यामुळे राज्याची बदनामी होत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डीत केला.
नागपूर येथील आमदार निवासात एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना नुकतीच उघडकीस आली असून ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीरपणे विचार करावा व कनिष्ठ नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, म्हणजे प्रशासनावर जरब बसेल, असे विखे म्हणाले.
अस्तगाव (ता. राहाता) येथील दरोड्याची घटना अतिशय गंभीर असून या दरोड्यात एका महिलेचा झालेला मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे. अलिकडच्या काळात चोऱ्या व दरोड्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाने सतर्कता ठेवण्याची गरज आहे. गावागावात ग्रामरक्षक दलांची स्थापना करण्यासाठी तरुणांनी व पोलीस प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन विखे यांनी केले. (प्रतिनिधी)