एसटीत साहित्य खरेदी घोटाळा
By admin | Published: March 26, 2016 01:40 AM2016-03-26T01:40:38+5:302016-03-26T01:40:38+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागात साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. नागपूर विभागीय कार्यालयाने केलेल्या चौकशीवरून खरेदी प्रक्रियेत अनियमितता
- रूपेश खैरी, वर्धा
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागात साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. नागपूर विभागीय कार्यालयाने केलेल्या चौकशीवरून खरेदी प्रक्रियेत अनियमितता असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रादेशिक व्यवस्थापकांनी दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
एसटी अर्थात परिवहन महामंडळात आवश्यक साहित्याची खरेदी विभागीय स्तरावर होते; मात्र किरकोळ साहित्य खरेदीचे अधिकार जिल्हास्तरावर स्थानिक विभागीय पुरवठा अधिकाऱ्यांना आहेत. खरेदीची देयके काढण्याचे अधिकार मात्र विभागीय लेखा अधिकाऱ्यांनाच आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या
साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची बाब पुढे आली. प्रादेशिक व्यवस्थापकांनी याचा ठपका दोन अधिकाऱ्यांवर ठेवला आहे.
ही खरेदी प्रक्रिया विनानिविदा करण्यात आली; तसेच खरेदी करताना लावण्यात आलेली साहित्याची किंमत व त्याच्या बाजारमूल्याची कुठलीही शहानिशा करण्यात आली नसल्याची तक्रार नागपूर येथील कार्यालयाला करण्यात आली होती. या तक्रारीवरून नागपूर येथील एका चमूने वर्धा येथे येऊन या व्यवहाराची तपासणी केली असता हा घोळ पुढे आला. या प्रकरणात खरेदी करणारे विभागीय पुरवठा अधिकारी व विभागीय लेखा अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना १५ दिवसांत याचे उत्तर सादर करावयाचे आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची खुली चौकशी करण्यात येणार आहे.
एसटीच्या वर्धा विभागातील सेवाग्राम येथे वाहनाचे सुटे भाग खरेदी करण्यासंदर्भात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार एका लिपिकाने न्यायालयात केली होती. यावरून येथील चार अधिकाऱ्यांसह एका लिपिकावर फेब्रुवारीत सेवाग्राम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
‘पत्र मिळालेच नाही’
वर्धा विभागीय कार्यालयाला कुठलेही पत्र मिळाले नसल्याचे येथील अधिकारी सांगत आहेत. लेखाधिकारी पाठक यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनीही आपल्याला असे कुठलेही पत्र मिळाले नसल्याचे सांगितले.
वर्धा विभागात साहित्य खरेदीसंदर्भात अनागोंदी असल्याची तक्रार नागपूर कार्यालयात आली होती. यावरून चौकशी करण्यात आली असता यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याचे दिसून आले. यामुळे वर्धा विभागाचे डीएओ (डिस्ट्रीक्ट अकाऊंट आॅफिसर) व डीएसओ (डिस्ट्रीक्ट सप्लायर आॅफिसर) या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
- ए.एन. गोहत्रे, प्रादेशिक व्यवस्थापक,
राज्य परिवहन महामंडळ, नागपूर