रोहित पवारांच्या ED चौकशीविरोधात सर्व सरकारी कार्यालयासमोर NCP करणार घंटानाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 06:37 PM2024-01-31T18:37:58+5:302024-01-31T18:40:22+5:30
आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर देखील जाऊन आंदोलनाला बसू शकतो हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे असं माजी आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं.
मुंबई - Rohit Pawar ED Enquiry ( Marathi News ) राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची १ फेब्रुवारी रोजी ईडी कडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी केंद्र सरकार विरोधात घंटानाद करण्यात येणार आहे. मागील चौकशीत ईडीनं १० तास रोहित पवारांना बसवून ठेवले. त्यानंतर आता पुन्हा १ फेब्रुवारीला चौकशी होत आहे. त्यामुळे रोहित पवारांची चौकशी पूर्ण होईपर्यंत अन्नत्याग आणि घंटानाद आंदोलन करण्यात येणार अशी माहिती पक्षाच्या प्रवक्त्या माजी आमदार विद्या चव्हाण यांनी दिली आहे.
विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं असताना देखील नोटिसा बजावण्यात येत आहे. देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर लोकशाही असेल आणि हुकूमशाही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात शिंदे सरकारने जाहीर केली नसेल तर आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर देखील जाऊन आंदोलनाला बसू शकतो हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच विरोधात असणाऱ्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात येते मात्र नंतर भाजपासोबत सत्तेत सहभागी झालेल्या यामिनी जाधव, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक, भावना गवळी या लोकांच्या चौकशीच काय झालं. यामध्ये २० ते २२ जणांची मोठी यादी आहे. या सर्व चौकशा थंड का पडल्या आहेत?. या सर्वांनी भाजपासमोर गुडघे टेकल्यामुळे आणि सत्तेसोबत गेल्यानं यांच्या चौकशी बंद झालेली आहे. भाजपासोबत सत्तेत सामील होण्यापूर्वी जर यांनी भ्रष्टाचार केला होता. तर मग या भ्रष्टाचारी फौजेला मोदी सरकारने आपल्या छत्र छायेत घेतल्यामुळे यांच्या चौकशी बंद झाल्या आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार रोहित दादा पवार भाजपच्या समोर गुडघे टेकत नसल्याने त्यांची चौकशी सुरू आहे असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान, रोहित पवार यांची ईडी कडून करण्यात येत असलेली चौकशी हास्यास्पद व निंदनीय आहे. ही चौकशी राजकीय सूडबुद्धीने केली जात आहे. रोहित पवार बेरोजगारीचा प्रश्न, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा-धनगर-लिंगायत यांच्यासाठीचं आरक्षण यांवर आवाज उठवत असल्याने सरकार अडचणीत येत आहे. रोहितदादा हे अजित पवार मित्रमंडळासोबत गेले असते तर ही चौकशी लागली नसती हे त्रिकालबाधित सत्य आहे. रोहित पवार ईडी कार्यालयात गेल्यानंतर बाहेर येईपर्यंत अन्नत्याग करणार आहोत असं प्रवक्ते विकास लवांडे यांनी म्हटले आहे.