खोट्या तक्रारी मागे न घेतल्यास जैन समाजाचे राज्यभर आंदोलन, दीक्षार्थींच्या फलक वादप्रकरणी इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 01:54 AM2021-02-20T01:54:12+5:302021-02-20T01:54:57+5:30
Jalgaon : अमळनेर येथील नवयुवक विनय बागरेचा (१६) हा जैन दीक्षा घेत आहे. याबाबत जैन समाजाने दीक्षार्थी युवकाच्या सन्मानार्थ काही फलक लावले होते.
अमळनेर (जि. जळगाव) : जैन दीक्षार्थीच्या सन्मानार्थ लावलेले फलक हटविणारे अमळनेर पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी जैन समाजातील युवकांवर दाखल केलेल्या खोट्या तक्रारी मागे घ्याव्यात; अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजाने दिला आहे. या मुजोर अधिकाऱ्यास बडतर्फ करण्याची मागणी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे.
अमळनेर येथील नवयुवक विनय बागरेचा (१६) हा जैन दीक्षा घेत आहे. याबाबत जैन समाजाने दीक्षार्थी युवकाच्या सन्मानार्थ काही फलक लावले होते. गत मंगळवारी रात्री उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी ते फलक काढून टाकले, तसेच यावेळी तिथे आलेल्या जैन समाजातील लोकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. समाजाच्या भावना दुखावल्याने गायकवाड यांच्याविरोधात युवकांनी तक्रार दिली. त्यावरून गायकवाड यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, आपले दुष्कृत्य बाहेर पडू नये, यासाठी गायकवाड यांनी युवकांना धमक्या दिल्या व खोट्या माहितीच्या आधारे विविध कलमांखाली तक्रार दिली. यानंतर गुन्हे दाखल झाले. या अधिकाऱ्यास तात्काळ बडतर्फ करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, युवकांविरुद्धच्या तक्रारी मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. संजय गोलेच्छा, भरत कोठारी, योगेश कोठारी, महावीर पहाडे, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, निशांत अगरवाल, प्रसन्न जैन, दीपक देसाई, पंकज मुंदडा या युवकांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी मागविला लेखी खुलासा
फलक वादप्रकरणी नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबत २४ तासांच्या आत लेखी खुलासा सादर करावा, अशी नोटीस अमळनेर न.पा.च्या मुख्याधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांना बजावली आहे.
समाजामधील समतोल बिघडविण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर अशांविरुद्ध सरकारने ताबडतोब कारवाई करावी.
-विजय दर्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा. जैन समाज
अमळनेर येथील या घटनेबाबत देशभरातील जैन समाजामध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे. या दोषी अधिकाऱ्यास शिक्षा होईपर्यंत लढा देऊ.
-ललित गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ