कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचं राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित; आदित्य ठाकरेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 01:26 PM2022-01-03T13:26:51+5:302022-01-03T13:27:17+5:30
कोरोनामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता राजकीय मेळावे, कार्यक्रमांवर निर्बंध आणण्यात आले आहेत.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रविवारी राज्यात १० हजाराहून अधिक रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारी घेत अनेक राज्यांनी कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालसारखेच महाराष्ट्रात अंशत: लॉकडाऊन लागू शकते असे संकेत मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिले होते.
कोरोनामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता राजकीय मेळावे, कार्यक्रमांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या ८ व ९ जानेवारी रोजी होणारं युवासेनेचं राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित करत असल्याची माहिती युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रक काढून दिली आहे. या पत्रकात सांगण्यात आले आहे की, युवासेनेचे(YuvaSena) राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन झंझावात नाशिक येथे ८ व ९ जानेवारी रोजी आयोजित केले होते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यात वाढणारा ओमायक्रॉनचा प्रभाव आणि वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता तरुणांच्या व नागरिकांच्या आरोग्याची काळजी व राज्य सरकारच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करण्याच्या सूचना युवासेनाप्रमुख मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी दिल्या.
त्यामुळे युवासेनेचे राज्यव्यापी अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. युवासेनेच्या या अधिवेशनाची पुढील तारीख राज्यातील कोरोना परिस्थिती पाहून लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई(Varun Sardesai) यांनी पत्रक काढून दिली आहे.
महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध?
ओमायक्रॉनचा धोका पाहता पश्चिम बंगालमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली तर तीच स्थिती इथे निर्माण होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चाही झाली आहे. ते निर्बंधाबाबत निर्णय घेतील. यात एक पर्याय म्हणजे राज्यात काही ठिकाणी कन्टेन्मेंट झोन करुन तिथे प्रवेश बंदी केली जाईल. गर्दी होणार नाही त्याची दक्षता घेण्यात येईल. रेल्वेत जी गर्दी होतेय त्यावरही मुख्यमंत्री गंभीर आहेत. कॅबिनेट आणि टास्कफोर्सच्या बैठकीत यावर चर्चा होईल. निर्णय होणे अपेक्षित आहे अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.