रेडिओलॉजिस्टचा राज्यव्यापी बेमुदत संप
By Admin | Published: June 19, 2016 02:31 AM2016-06-19T02:31:28+5:302016-06-19T02:31:28+5:30
राज्यातील मुलींचा घटता जन्मदर वाढावा, म्हणून ‘प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स’ (पीसीपीएनडीटी) कायदा कडकपणे लागू करण्यात आला, पण या कायद्यांतर्गत कारवाई
मुंबई : राज्यातील मुलींचा घटता जन्मदर वाढावा, म्हणून ‘प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स’ (पीसीपीएनडीटी) कायदा कडकपणे लागू करण्यात आला, पण या कायद्यांतर्गत कारवाई करताना सबळ पुरावे हाती नसतानाही, रेडिओलॉजिस्टची सोनोग्राफी मशिन सील केली जात आहेत. निर्दोष रेडिओलॉजिस्टवर केल्या जाणाऱ्या कारवाईविरुद्ध राज्यातील २ हजार रेडिओलॉजिस्ट सोमवार, २० जूनपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
पुण्यातील रेडिओलॉजिस्ट डॉ. आशुतोष जपे यांनी एका गर्भवती महिलेची सोनोग्राफी केली होती. त्या वेळी गर्भात दोष असल्याचे त्यांनी महिलेला सांगितले होते. या महिलेचा एफ फॉर्म आॅनलाइन भरताना त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यामुळे डॉ. जपे यांचे मशिन सील करण्यात आले. प्रत्यक्षात आॅनलाइन फॉर्म अपूर्ण भरला गेल्याच्या स्थितीतही अनेकदा कारवाई होताना दिसते. पुण्यात अशा प्रकारे निर्दोष रेडिओलॉजिस्टवर कारवाई सुरू आहे. अशा प्रकारे कारवाई होत असल्यामुळे रेडिओलॉजिस्ट भीतीच्या छायेखाली आहेत. या संदर्भात राज्य सरकार, आरोग्य खात्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी सांगितले.
१४ जूनपासून पुण्यातील रेडिओलॉजिस्ट संपावर आहेत, पण पुणे महानगरपालिकेशी चर्चा करूनही कोणताही तोडगा निघाला नाही, त्यामुळे राज्यव्यापी संप करत आहोत. यात रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून आपत्कालीन स्थितीत रुग्णांच्या चाचण्या करण्यात येणार असल्याचेही डॉ. ठक्कर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
रेडिओलॉजिस्टच्या मागण्या
- निर्दोष डॉ. जपे यांच्यावरील आरोप काढून टाका
- डॉ. जपे यांच्या मशिनचे सील काढा
- पुणे महापालिकेतील दोषींवर कारवाई करा