संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुकाणू समितीचा उद्यापासून राज्यव्यापी जनजागरण दौरा
By admin | Published: July 9, 2017 03:31 PM2017-07-09T15:31:04+5:302017-07-09T15:31:04+5:30
शेतकरी प्रश्नांवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून सुकाणू समितीच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरु करण्यात येत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - शेतकरी प्रश्नांवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून सुकाणू समितीच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण यात्रा सुरु करण्यात येत आहे. उद्या दिनांक 10 जुलै रोजी नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या जनजागरण यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. सुकाणू समितीमध्ये सामील असलेल्या सर्व प्रमुख संघटना या जनजागरण यात्रेत सामील होत आहेत. सुकाणू समिती संपूर्ण राज्याचा दौरा करीत प्रमुख १४ ठिकाणी भव्य जाहीर सभांना संबोधित करणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात केलेल्या फसवणुकी विरोधात यात्रेतून जनजागरण केले जाणार असून संपूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी लढ्याची दिशा या जनजागरण यात्रेतून ठरवली जाणार आहे.
शेतकरी संप व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत जाचक अटी लावण्यात आल्या. केवळ थकबाकीदार शेतक-यांचेच कर्ज माफ करण्याची भूमिका घेण्यात आली. कर्जमाफी रकमेसाठी दीड लाखाची मर्यादा लावण्यात आली. थकीततेसाठी 30 जून 2017 ची अट घालण्यात आली. नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना वा-यावर सोडण्यात आले. पॉलीहाउस, सिंचन, शेडनेट, इमूपालन आदींसाठी घेतलेल्या कर्जांना कर्जमाफीतून वगळण्यात आले. चुकीच्या व फसवणूक करणा-या आकड्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्यात आली. वारंवार शासनादेश काढून व भूमिका बदलून कर्जमाफीचा पोरखेळ केला गेला. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधाने करण्यात आली. शेतकरी समुदायामध्ये सरकारच्या या सर्व विश्वासघाता विरोधात अत्यंत संतापाची भावना आहे. जनजागरण यात्रेत शेतक-यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याची पुढील रणनीती ठरविली जाणार आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. शेतकरी संघटनांची ही एकजूट जनजागरण यात्रेच्या माध्यमातून जिल्हा व गाव स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न या यात्रेत होणार आहे. शेतक-यांची तरुण पिढी या आंदोलनाचे गावोगाव नेतृत्व करत होती. यात्रे दरम्यान या तरुणाई बरोबर संवाद साधण्यात येणार आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांनाही वाचा फोडण्याचा प्रयत्न यात्रे दरम्यान होणार आहे.
शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्याची नितांत गरज आहे. शेतीमालाला भाव मिळावा व शेतक-यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यात्रे दरम्यान या मागणीसाठी व्यापक प्रचार करण्यात येणार आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी गावोगाव पोहचविण्यासाठी पुस्तिका व प्रचार साहित्य तयार करण्यात आले आहे. यात्रेद्वारे हे साहित्य शेतक-यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. सुकाणू समितीमध्ये सामील झालेल्या सर्व शेतकरी संघटनांनी यात्रेसाठी स्वतंत्र प्रचार रथांचे नियोजन केले आहे. जिल्हा स्थरावर यात्रेच्या निमित्ताने सर्व संघटनांनी एकत्र येत भव्य जाहीर सभांचे आयोजन केले आहे. शेतक-यांची तरुण पिढी यासाठी अत्यंत उत्स्फूर्त पुढाकार घेत आहे.
नाशिक येथून दिनांक 10० जुलै रोजी सुरु होणारी जनजागरण यात्रा ठाणे (पालघर), रायगड (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), अहमदनगर, धुळे (नंदुरबार, जळगाव), अमरावती (यवतमाळ), बुलढाणा (अकोला,वाशीम), वर्धा (नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा, गोंदिया), नांदेड , परभणी (हिंगोली, औरंगाबाद, जालना), बीड (लातूर), सोलापूर (उस्मानाबाद), कोल्हापूर, सांगली मार्गे जाणार असून पुणे येथे दिनांक २३ जुलै रोजी यात्रेचा समारोप होणार आहे.