नाक्यानाक्यांवर ठिय्या
By admin | Published: February 1, 2017 02:51 AM2017-02-01T02:51:20+5:302017-02-01T02:51:20+5:30
कोपर्डी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी मिळावी, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे आदी मागण्यांकडे पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी,
ठाणे : कोपर्डी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी मिळावी, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे आदी मागण्यांकडे पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, ठाण्यातही मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आनंदनगर चेकनाका येथे चक्का जाम करण्यात आला. सकाळी ९ वा. गटागटाने जमलेल्या या कार्यकर्त्यांनी १० वाजता एकत्रित येऊन, १०.१५ वा.च्या सुमारास वाहने रोकण्याचा प्रयत्न केला. वाहने अडविल्यावर काही छायाचित्रे काढल्यानंतर, मोठी कुमक घेऊन बंदोबस्तावर असलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले आणि कोपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कोर्डे आदींनी ५२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ताब्यात घेतले. त्यांनी शांतता राखण्याची ग्वाही दिल्यानंतर, त्यांची कलम ६९ अन्वये सुटका केली.
कल्याण-डोंबिवलीत
सरकारचा निषेध
आरक्षण आणि अन्य मागण्यांसंदर्भात जिल्हा पातळीवर काढण्यात आलेल्या मूक मोर्चानंतर, मंगळवारी मराठा समाजातर्फे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कल्याण, डोंबिवली, मोहने परिसरात समाज बांधव आणि भगिनींनी चक्काजाम करून, सरकारच्या उदासीन कारभाराचा निषेध केला.
कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, पूर्वेतील सूचक नाका, कोळसेवाडी, कल्याण ग्रामीणमधील मोहना, एनआरसी गेटसह डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा चार रस्ता अशा विविध ठिकाणी हे आंदोलन छेडण्यात आले. या वेळी मराठा समाज बांधवांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर ठिय्या मांडून, दोन्ही बाजूंकडील वाहतूक रोखून धरली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून काही वेळाने त्यांची सुटका केली. ६ मार्चला मुंबईत मराठा समाजाचा महामूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल, कोपर्डी अत्याचारातील आरोपींना तातडीने फाशी व्हावी, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत विविध ठिकाणी चक्काजाम
कांदिवली आणि दहिसर चेकनाका परिसरात मराठी क्रांती मोर्चामध्ये महिला आक्रमक झालेल्या दिसून आल्या. भररस्त्यात महिलांनी घोषणाबाजी करत जवळपास तासभर ‘चक्काजाम’ केला. कांदिवलीच्या साईधाम परिसरात सकाळी आठच्या दरम्यान हा चक्काजाम केला जाणार होता. त्यामुळे समतानगर पोलिसांनी या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र, त्या ठिकाणी एकही कार्यकर्ता फिरकला नाही.
मात्र, दहिसर चेकनाका परिसरात जिजाऊंचा फोटो घेऊन, हातात भगवे झेंडे तर डोक्यावर भगव्या टोप्या घातलेला दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले. भर रस्त्यात यातील महिला कार्यकर्त्या रस्त्यात ठाम मांडून बसल्या, ज्यामुळे चारही बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला. जवळपास तासभर तरी ही वाहतूक रोखल्यामुळे दोन रुग्णवाहिका या परिसरात अडकून पडल्या. मात्र, पोलिसांमुळे त्या बाहेर काढण्यात आल्या.
भांडुपमध्ये प्रयत्न फसला
भांडुप परिसरात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे घोषणाबाजी पूर्वीच पोलिसांनी त्याला व्हॅनमध्ये बसविले. यावेळी जवळपास ६० ते ७० कार्यकत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गांधीनगर सिग्नलवर रास्तारोको
विक्रोळीच्या गांधीनगर सिग्नल परिसरातच आंदोलकांनी रास्तारोको केल्यामुळे वाहतूककोंंडीची समस्या उद्भभवली होती. जवळपास १५ ते २० मिनिटे येथील वाहतूक थांबविण्यात आली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी घेत, आंदोलकांना ताब्यात घेतले. घाटकोपर येथून सुरुवात झालेल्या मोर्चा पवईच्या दिशेने जाणार होता. त्यापूर्वीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणली.
मीरारोडमध्ये वाहनांच्या लांब रांगा
दहिसर चेकनाका येथे अर्धा तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच सर्वांनी ठिय्या केला. मुंबईच्या दिशेने थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत तर काशिमीरा हद्दीत घोडबंदरपर्यंत रांगा होत्या. आंदोलकांच्या वतीने तरुणींनी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना निवेदन दिले. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.
चेंबूरमध्ये पोलिसांची संख्या जास्त
चेंबूरच्या पांजरापोळ सर्कल येथे केवळ ७० ते ८० जणांनीच सहभाग घेतला. मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून चेंबूरच्या पांजरापोळ सर्कलची ओळख आहे. त्यामुळे अनेक पक्ष अथवा संघटना याच ठिकाणी येऊन आंदोलन करत असतात. त्यानुसार, मंगळवारीदेखील या ठिकाणी मोठा चक्काजाम होणार अशी सूचना पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे, पोलिसांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केला होता.
मात्र अकरा वाजेपर्यंत केवळ ७० ते ८० आंदोलकांनीच याठिकाणी हजेरी लावली. आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्या याठिकाणी मोठी होती. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार याठिकाणी घडला नाही. त्यानंतर केवळ १० मिनिटे याठिकाणी वाहतूक बंद केली होती. तसेच मानखूर्द टी जंक्शन येथे देखील मराठा समाजाकडून काही वेळ वाहतूक ठप्प करण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्तामुळे ५ ते १० मिनिटेच येथेही वाहतूक ठप्प झाली होती.
ड्रोनमार्फत मोर्चाचे छायाचित्रण
मुंबईतील मराठा क्रांती मोर्चासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनमार्फत त्याचे चित्रण करण्यात आले. कार्यकत्यांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते. त्यामुळे मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मुंबईत वाहतूककोंडीची समस्या सोडल्यास कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली.
भिवंडीत अर्धा तास आंदोलन : मराठा समाजाच्या वतीने राजीव गांधी चौकात चक्काजाम आंदोलन केले. सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली अर्धा तास आंदोलन केले. सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी
यांनी आंदोलकांना अटक करून, नंतर त्यांची सुटका केली.
गुजरातचे राज्यपालही अडकले : आंदोलनामुळे गुजरातचे राज्यपाल ओ.पी.कोहलीदेखील अडकले. त्यांच्या वाहनासोबत असलेला अन्य वाहनांचा ताफाही अर्धा तास एकाच जागी खोळंबला होता. त्यांच्या सुरक्षारक्षकांनी खाली उतरून राज्यपालांच्या वाहनाला कडे केले होते.