स्थानकांचा कारभार सुधारणार स्थानक संचालक
By admin | Published: October 3, 2016 05:39 AM2016-10-03T05:39:51+5:302016-10-03T05:39:51+5:30
रेल्वे स्थानकांचा कारभार सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशभरातील ७५ स्थानकांवर स्थानक संचालकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला
मुंबई : रेल्वे स्थानकांचा कारभार सुधारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशभरातील ७५ स्थानकांवर स्थानक संचालकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला असून, मुंबईतील सीएसटी व एलटीटी येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ७५ महत्त्वाच्या स्थानकांचा कारभार उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधून निवडलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सीएसटी येथे परिचालन विभागातील विभागीय परिचालन व्यवस्थापक (मालवाहतूक)शिवाजी सुतार आणि एलटीटी येथे परिचालन व्यवस्थापक (कोचिंग)रॉबिन कालिया यांची नियुक्ती केली आहे. स्थानकांवर सध्या स्टेशन अधीक्षक कार्यरत आहेत. मात्र या अधिकाऱ्यांना निधीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. स्थानकांवरील प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, तिकीटविक्री, पार्सल, मालवाहतूक यासाठी असलेल्या विविध विभागांचे प्रमुख निर्णय घेतात. आता या विभागांशी संबंधित सर्व निर्णय हे स्थानक संचालक घेतील. या स्थानक संचालकांना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडेही जाण्याची गरज नसेल, असे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. स्थानक संचालकांकडे निधी देण्यासंबंधीचे निर्णय आल्याने स्थानकातील प्रवासी सुविधेसाठी लागणारे निर्णय झटपट होण्यास मदत मिळेल. (प्रतिनिधी)