‘त्या’ स्टेशन मास्तरला ४ वर्षे सश्रम कारावास
By admin | Published: May 23, 2016 04:36 AM2016-05-23T04:36:30+5:302016-05-23T04:36:30+5:30
सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा
औरंगाबाद : सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (रेल्वे) ए.सी. डोईफोडे यांनी एकूण चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच तत्कालीन पॉइंटस्मन विनायक नागरगोजे याला दोन वर्षे कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.
एक मालगाडी ३ जानेवारी २००३ रोजी मध्यरात्री सिग्नल मिळाल्याने घाटनांदूर रेल्वेस्टेशनच्या ‘मेन लाईन’वर उभी होती. पहाटे १.३० वाजता ‘सिकंदराबाद-मनमाड’ एक्स्प्रेस लातूर रोडहून घाटनांदूर मार्गे परळीकडे रवाना होणार होती. ही रेल्वे घाटनांदूरला आल्यानंतर हिरवे ‘आऊटर’ आणि ‘होम’ सिग्नल देऊन ही रेल्वे ‘मेन लाईन’वर जाण्याचा संकेत देण्यात आला. त्यानुसार ही रेल्वे मेन लाईनवर रवाना झाली. या रेल्वेने होम सिग्नल पार केल्यानंतर मेन लाईनवर मालगाडी उभी असल्याचे रेल्वेचालकाला दिसले. म्हणून रेल्वे थांबविण्यासाठी चालकाने ‘इमर्जन्सी ब्रेक’ (आपत्कालीन) लावले; परंतु दुर्र्दैवाने ही रेल्वे मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. परिणामी रेल्वेचे इंजिन, ए.सी. कोच, एक जनरल बोगी रुळाखाली घसरली. तसेच ७४ लोक गंभीर जखमी झाले होते आणि २० लोक मरण पावले होते.
परळीच्या रेल्वे पोलिसांनी सदर अपघाताचा तपास करून स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मनविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीअंती न्यायालयाने स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मन यांना दोषी ठरवले आणि स्टेशन मास्तर वर्मा याला भा.दं.वि. कलम ३०४ (अ) खाली दोन वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. (प्रतिनिधी)