रेल्वेखाली सापडून स्टेशन मास्टरचा मृत्यू
By Admin | Published: May 9, 2014 01:59 AM2014-05-09T01:59:26+5:302014-05-09T01:59:26+5:30
घाईघाईने ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आशीषकुमार चौधरी (३४) रा. बाणगाव या सहायक स्टेशन मास्तरचा बुधवारी रात्री ट्रेनखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
बोईसर/पालघर : आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पत्नी व दोन लहान मुलांसह बोईसर येथे खरेदी केल्यानंतर मुलांना भूक लागल्याने त्यांच्यासाठी खाऊ घेऊन घाईघाईने ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आशीषकुमार चौधरी (३४) रा. बाणगाव या सहायक स्टेशन मास्तरचा बुधवारी रात्री ट्रेनखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बिहारमधील सीतामढी येथील आशीषकुमार चौधरी हे चार वर्षांपासून वाणगाव रेल्वे स्टेशनवर सहायक स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. पत्नी सुगंधा, ४ व ६ महिन्यांच्या दोन मुलांसह ते वाणगावच्या रेल्वे क्वॉर्टर्समध्ये राहत होते. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दुपारी ड्युटी संपवून ते आपल्या पत्नी व दोन मुलांसह खरेदी करण्यासाठी बोईसर येथे गेले होते. सर्व खरेदी केल्यानंतर घरी जाण्यासाठी ते वाणगावच्या दिशेने जाणार्या ५९०२३ डाऊन बलसाड एक्स्पे्रस गाडीची वाट पाहत रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बोईसर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे होते. गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसह मुलांना फर्स्ट क्लासच्या डब्यात बसवले. याच वेळी मुलाने भूक लागल्याने आपल्याला खाऊ हवा, अशी मागणी चौधरी यांच्याकडे केली. खाऊ घेऊन परत येत असताना बलसाड ट्रेन सुरू झाली. ती धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात ते प्लॅटफॉर्मच्या खाली गॅपमध्ये पडले व त्यांच्या अंगावरून गाडी जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणखी एकाचा मृत्यू गुरुवारी रात्री १२.१५ वा़ पालघर-बोईसरदरम्यान एका ट्रेनमधून सुदर्शन लक्ष्मण तांडेल, रा. न्यू पनवेल (३४) हा खाली पडून जागीच मृत्यू झाल्याची नोंद पालघर रेल्वे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पो.नि. रवींद्र नाईक करीत आहेत. (वार्ताहर)
थेट मृतदेहच समोर आला
ट्रेन पुढे निघून गेल्यानंतर बोईसर स्टेशनवरून काही वेळानंतर आशीष चौधरी यांच्या पत्नीशी मोबाइलवरून संपर्क साधून तुमच्या पतीची तब्येत बरी नसल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आल्याचे कळवण्यात आले. आपल्या पतीची वाट पाहणार्या दुर्दैवी सुगंधा यांच्यापुढे पतीचा मृतदेहच आला.