कोल्हापूरच्या अंबाबाई देवी मूर्तीचे ऑगस्टअखेर संवर्धन
By Admin | Published: June 10, 2015 01:46 AM2015-06-10T01:46:01+5:302015-06-10T01:46:01+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला (केमिकल कॉन्झर्वेशन) केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मान्यता दिली आहे.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला (केमिकल कॉन्झर्वेशन) केंद्रीय पुरातत्त्व खात्याने मान्यता दिली आहे. प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी मूर्तीची पाहणी करणार आहेत.
अंबाबाईच्या मूर्तीवर वज्रलेप करावा की करू नये, या विषयावर १४ वर्षे न्यायालयात खटला सुरू होता. श्रीपूजकांच्या पुढाकाराने हा खटला वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग होऊन काही महिन्यांपूर्वीच ‘केमिकल कॉन्झर्वेशन’वर एकमत होऊन विषय निकाली निघाला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे गेला. मात्र, त्यावर केंद्राकडून कोणतेही उत्तर किंवा प्रतिसाद न मिळाल्याने विषय रखडला होता.
गेल्या महिन्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीसाठी आलेल्या पक्षाध्यक्ष अमित शहा यांना श्रीपूजक मंडळाने मूर्तीच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. शहा यांनी तातडीने त्याचा पाठपुरावा केला. औरंगाबाद येथील केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून श्रीपूजक मंडळाशी संपर्क साधून आदेशाची माहिती दिली. ‘केमिकल कॉन्झर्वेशन’चा खर्च देवस्थान समिती व धार्मिक विधींचा खर्च श्रीपूजकांनी करायचा, असे निकालात नमूद आहे. (प्रतिनिधी)
सप्टेंबरमध्ये त्रिशताब्दी
अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला सप्टेंबरमध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याआधीच म्हणजे आॅगस्टमध्ये मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने महोत्सवाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.