बैठकांचा रतीब, तरीही घोडं अडलेलं..
By admin | Published: September 21, 2014 02:07 AM2014-09-21T02:07:24+5:302014-09-21T02:07:24+5:30
शुक्रवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी ओम माथूर यांना केलेला फोन खणखणला आणि मागील शुक्रवारपासून बंद पडलेली शिवसेना-भाजपा युतीमधील जागावाटपाची चर्चा सुरु झाली..
Next
शुक्रवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी ओम माथूर यांना केलेला फोन खणखणला आणि मागील शुक्रवारपासून बंद पडलेली शिवसेना-भाजपा युतीमधील जागावाटपाची चर्चा सुरु झाली.. भाजपाच्या कोअर कमिटीच्या आणि शिवसेना नेत्यांच्या बैठकांचे रतीब सुरु राहिले.. वेगवेगळे नेते परस्परांच्या भेटीगाठी घेत राहिले. मात्र शनिवारचा सूर्यास्त होईर्पयत जागावाटपाचं घोडं अडून राहिले.
अन् शिवसेनच्या प्रस्तावाने भाजपा नेते निराश
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांचा फोन आला. उद्धव म्हणाले की, जागावाटपाची चर्चा सुरु करायची आहे. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांना मी आपल्या भेटीला धाडत आहे. पेडर रोड येथील ओसवाल यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे नेते पोहोचले तेव्हा काही तरी नवीन प्रस्ताव घेऊन हे आले असतील, अशी भाजपा नेत्यांची भावना होती. मात्र देसाई यांनी सुरुवातीलाच 119 जागांच्यावर जागा देणो अशक्य असल्याचा सूर लावला. बैठकीनंतर शिवसेनेचे नेते निघून गेल्यावर भाजपाच्या गोटात निराशेचाच सूर होता.
प्रस्ताव आला की नाही?
रात्री महापौर बंगल्यावर उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, अनिल देसाई वगैरे मंडळींची चर्चा झाली. तेथून बाहेर पडताना उद्धव ठाकरे यांनी आपण भाजपाला नवीन प्रस्ताव दिल्याचे वाहिन्यांना सांगितले. त्यामुळे भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांना फोन करून आपल्याकडे कुठलाही नवा प्रस्ताव आलेला नाही हे तात्काळ स्पष्ट केले.
155-126
चा फॉम्यरुला अमान्य
शनिवार सकाकाळपासून वेगवेळे प्रस्ताव बाहेर येत होते. शिवसेनेच्या गोटातून सांगितले गेले की, शिवसेना 155 तर भाजपा 126 जागा लढवेल. याखेरीज स्वाभिमानला 7 जागा देण्यात येतील. रिपब्लिकन, राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांनी आमच्या जागा घ्या पण युती टिकवा, असे आवाहन केले असल्याने त्यांना वेगळ्य़ा जागा सोडण्याची गरज नाही. भाजपाच्या नेत्यांची कोअर कमिटीची बैठक सकाळपासून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर सुरु होती.
आज सेनेचा अंतिम फैसला : शिवसेनेने उद्या दुपारी रंगशारदा सभागृहात राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे तर भाजपाच्या केंद्रीय निवड मंडळाची बैठक दिल्लीत आहे. त्यापूर्वी हा तिढा सुटणार का, याविषयी उत्सुकता आहे.
रिपाइंला हव्यात दहा जागा
दुपारी वरील जागांचा प्रस्ताव घेऊन सुभाष देसाई हे वरळीला खासदार पूनम महाजन यांच्या निवासस्थानी ओम माथूर व देवेंद्र फडणवीस यांना भेटले. रिपाइंला जागा नकोत का? अशी विचारणा भाजपाच्या नेत्यांनी आठवले यांच्याकडे केल्यावर दहा जागांवर दावा करणारे पत्र घेऊन अविनाश महातेकर यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारपासून पुन्हा भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक सुरु झाली. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांची पुन्हा बैठक होणार असा दावा भाजपा करीत असली तरी त्याबाबत अनिश्चितता होती.