महापुरुषांच्या पुतळ्यांना आता अंतराची सीमा
By admin | Published: May 3, 2017 04:28 AM2017-05-03T04:28:52+5:302017-05-03T04:28:52+5:30
एखाद्या महापुरुषाचे एकापेक्षा अधिक पुतळे एकाच गावात उभारण्यास आता अंतराची सीमारेषा आखण्यात आली आहे.
मुंबई : एखाद्या महापुरुषाचे एकापेक्षा अधिक पुतळे एकाच गावात उभारण्यास आता अंतराची सीमारेषा आखण्यात आली आहे. दोन किमीच्या आत पुतळे उभारता येणार नाहीत, असा आदेश मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाने काढला. पुतळा उभारणाऱ्या संस्थेवर संबंधित पुतळ्याची देखभाल, पावित्र्य अन् मांगल्य राखण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.
यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार एखादा पुतळा उभारण्यापूर्वी त्या पुतळ्यासंबंधीच्या सर्व खर्चाची जबाबदारी पुतळा उभारणाऱ्या संस्थेची असेल. तसे वचनपत्र घेण्यात येईल. रस्ते रुंदीकरण वा अन्य विकास कामांमुळे पुतळा हलविण्याचा प्रसंग उद्भवल्यास त्यास विरोध न करता आवश्यक ती कार्यवाही स्वखर्चाने करण्याबाबत पुतळा उभारणाऱ्या संस्थेचे शपथपत्र घेण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला पुतळ्याचा प्रस्ताव मंजुरीचा अधिकार असेल. परवानगीशिवाय पुतळा उभारणाऱ्यांवर कारवाई करून पुतळा हटविण्यात येईल. पुतळा उभारणाऱ्या संस्थेने पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेऊन ब्राँझ वा अन्य धातू, फायबर वा इतर साहित्यापासून पुतळा तयार करावा व मान्यता घेतलेल्या मॉडेलनुसारच पुतळा उभारावा, असा दंडक असेल. पुतळा उभारल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, जातीय तणाव वाढणार नाही या बाबतचे स्थानिक पोलीस कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)