पुतळ्यांची सुरक्षा रामभरोसे
By admin | Published: January 7, 2017 01:23 AM2017-01-07T01:23:27+5:302017-01-07T01:23:27+5:30
शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या वतीने त्यांचे पुतळे बसविण्यात आले.
अनिल पवळ,
पिंपरी- महापुरुष, समाजसेवकांच्या कार्याची नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी शहरातील विविध भागांमध्ये महापालिकेच्या वतीने त्यांचे पुतळे बसविण्यात आले. मात्र, या पुतळ्यांची सुरक्षा आणि देखभालीच्या बाबतीत पालिका प्रशासन उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकला. त्यापार्श्वभूमीवर शहरातील निगडी, चिंचवड, पिंपरी, सांगवी, पिंपळे गुरव अशा उपनगरांमध्ये महापालिकेने उभारलेल्या चौका-चौकांतील पुतळ्यांची लोकमत प्रतिनिधींनी पाहणी केली. मात्र, शहरातील जवळजवळ ९० टक्के पुतळ्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. पुतळ््याभोवती साचलेली धूळ, परिसरातील अस्वच्छता, सुरक्षारक्षकांचा अभाव यांमुळे पालिका प्रशासनाला पुतळ्याच्या सुरक्षेविषयी गांभीर्य नसल्याचे दिसून येते.
>निगडी येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याची पाहणी केली असता, या पुतळ्याला अतिक्रमणाचा विळखा पडला असल्याचे दिसून येते. विक्रेत्यांच्या हातगाड्या पुतळ्यासमोरच उभ्या केल्या जातात. शिवाय या पुतळ्याच्या समोरच अनेकवेळा अनधिकृतपणे फ्लेक्स लावले जातात. तसेच हा पुतळा भर चौकात असल्याने येथे सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक वर्षांपासून येथे सुरक्षारक्षक नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या चौकाच्या शेजारील उद्यानात महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा आहे. मात्र, या पुतळ्याच्या भोवताली गर्दुले आणि दारुड्यांचा ठिय्या पाहायला मिळाला. या गर्दुल्यांकडून येथे विघातक कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
>चिंचवड स्टेशन येथील मुख्य चौकामध्ये वासुदेव बळवंत फडके आणि लहुजी साळवे यांचे पुतळे आहेत. देखभालीअभावी या पुतळ्यावर धुळीचा थर साचला आहे. तसेच पुतळ्याच्या आसपास कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळाले. हा चौक वर्दळीचा असून अनेक वादावादीचे प्रसंगही येथे घडत असतात. तसेच भिकाऱ्यांचाही येथे ठिय्या आहे. मात्र या पुतळ्यांजवळ देखील सुरक्षारक्षक पाहायला मिळाला नाही.
>येथील मोरवाडी चौकात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आहे. महापालिकेवर येणारे मोर्चे, आंदोलने या पुतळ्याशेजारीच थोपवली जातात. त्यामुळे अशा ठिकाणच्या पुतळ्याची सुरक्षा करण्यासाठी व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र, येथेही सुरक्षारक्षक दिसून येत नाहीत. शिवाय या पुतळ्यावरील मेघडंबरीवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
>येथील बाजारपेठेशेजारी शहीद भगतसिंग यांचा पुतळा आहे. मात्र, हा पुतळादेखील अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फळविक्रेते आणि अनधिकृत प्लेक्स यांमुळे हा पुतळा लवकर दृष्टीसही पडत नाही. तसेच पालिकेचे सुरक्षारक्षकही पाहायला मिळाले नाहीत.
तसेच देखभालीअभावी पुतळा अस्वच्छ बनला आहे.
>येथील चौकात राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पुतळा आहे. या पुतळ्याची अनेक महिन्यांपासून स्वच्छता केली नसल्याचे पाहायला मिळाले. तसेच अनधिकृत फ्लेक्सच्या गराड्यात हा पुतळा दिसेनासा झाला आहे. या पुतळ्याच्या देखभालीसाठी आणि सुरक्षेसाठी आवश्यक ती यंत्रणा पाहायला मिळाली नाही.
>पुतळा तत्परतेने, मात्र देखभालीकडे दुर्लक्ष
शहरातील विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांच्याकडून महापुरुषांचा पुतळा बसविण्याची मागणी केली जाते. मतांचे राजकारण आणि विकासकामे दाखविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही मागणीला जोर लावला जातो. पालिका प्रशासनाकडून तत्परतेने पुतळा बसविला जातो. मात्र, या पुतळ्याची नियमित देखभाल व्हावी, यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा प्रशासन उभी करत नाही.