देशात आर्थिक अराजकतेची स्थिती - चव्हाण
By admin | Published: November 18, 2016 05:29 AM2016-11-18T05:29:53+5:302016-11-18T05:29:53+5:30
धनदांडग्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देण्यासाठी मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचा बळी देत आहे.
नांदेड : धनदांडग्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देण्यासाठी मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचा बळी देत आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोदी सरकारचा निर्णय लोकांच्या जिवावर बेतला असून, आजपर्यंत नांदेडसह राज्य व देशभरात ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मोदी सरकार आणखी किती लोकांचे बळी घेणार आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारने कुठलीही पूर्वतयारी आणि पुरेशी पर्यायी व्यवस्था न करता नोटा चलनातून बाद केल्याने देशात आर्थिक अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. एटीएम आणि बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा आहेत. चार-चार दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नसल्याने नागरिकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.
रुग्णालय जुन्या नोटा स्वीकारत नसल्याने उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत, शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. लग्नकार्ये खोळंबली आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. बँकेतून पैसे मिळत नसल्याने बाजार समित्यामधील व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आहे. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही सरकार मात्र लोकांना त्रास होऊ नये म्हणून कुठलीही तातडीची उपाययोजना केली जात नाही. नोटा बदलून घेण्याच्या गोंधळात झालेल्या सर्व मृत्यूला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. कर्जबुडव्या धनदांडग्या उद्योगपतींना कर्जमाफी देता मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही, असा सवाल खा. चव्हाण यांनी केला आहे. (प्रतिनिधी)