'पुस्तकांचे गाव ' ला योजनेचा दर्जा : आगामी काळात योजनेची व्याप्ती वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:04 PM2019-09-18T12:04:06+5:302019-09-18T12:06:16+5:30
मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व संस्कृतीची जोपासनी व्हावी तसेच भाषेविषयीची आवड निर्माण व्हावी या उददेशाने भिलार येथे 'पुस्तकांचे गाव' ही संकल्पना आकारास आली.
नम्रता फडणीस
पुणे : 'हे ऑन वे ' या वेल्स ( इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर भिलार येथे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या 'पुस्तकांचे गाव ' या उपक्रमाला योजनेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार आगामी काळात या योजनेची व्याप्ती वाढविली जाणार आहे. हा उपक्रम योजनेच्या स्वरूपात कार्यान्वित झाल्यामुळे मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय तो बंद करता येणार नाही.
मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व संस्कृतीची जोपासनी व्हावी तसेच भाषेविषयीची आवड निर्माण व्हावी या उददेशाने भिलार येथे 'पुस्तकांचे गाव' ही संकल्पना आकारास आली. त्यानुसार तेथील स्थानिक जनतेच्या सहभागातून वाडमयातील विविध विषयानुरूप पुस्तकांची दालने विकसित करण्यात आली. 4 मे 2017 रोजी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शासन आणि लोकसहभागातून साकार झालेल्या पुस्तकांच्या गावातील विविध दालनांना दोन वर्षात वाचक आणि पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या . 'पुस्तकांचे गाव'ला मिळत असलेला हा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन हा उपक्रम स्वतंत्रपणे योजना म्हणून राबविण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता. त्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उपक्रमाला योजना म्हणून कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी ' लोकमत' शी बोलताना दिली.
ते म्हणाले, या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्षकांतर्गत सुमारे दीड कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून, योजनेच्या व्यवस्थापनासाठी प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहायक, कार्यालयीन सहायक, लिपीक टंकलेखक आणि शिपाई अशा पदांची भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन पुस्तकांचे गाव भिलार येथे आगामी काळात अधिक व्यापक दृष्टीकोनातून विविध साहित्यिक उपक्रम, साहित्य प्रकाशन, कार्यशाळा तसेच पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, साहित्य जत्रा, मान्यवर साहित्यिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे.तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी खुल्या प्रेक्षागृहाचे व्यवस्थापन, समूह निवा-याची सोय, स्वच्छतागृहाचे बांधकाम, वाहनतळ, रस्ते दुरूस्ती, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. कोणताही उपक्रम पाच ते सहा वर्ष चालविला तर तो बंद करता येणे शक्य होते. पण आता या उपक्रमाचे रूपांतर योजनेमध्ये झाल्यामुळे तो मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय बंद करता येणार नाही.
----------------------------------------------------------------