प्रतिभावंतांच्या पाठीशी राहू-मुख्यमंत्री
By Admin | Published: February 28, 2015 04:47 AM2015-02-28T04:47:02+5:302015-02-28T06:00:41+5:30
मराठी भाषेला केवळ अभिजात दर्जा मिळून चालणार नाही, तर मराठीला व्यवहाराची भाषा बनवावे लागेल. मराठी साहित्याने माणूस आनंदी वा अंतर्मुख होतो;
नाशिक : मराठी भाषेला केवळ अभिजात दर्जा मिळून चालणार नाही, तर मराठीला व्यवहाराची भाषा बनवावे लागेल. मराठी साहित्याने माणूस आनंदी वा अंतर्मुख होतो; पण ही भाषा जगण्याला मदत करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चीन, जपान या देशांनी आपल्या भाषांना जगण्याचे साधन बनविले. आधुनिक जगातील माहिती तंत्रज्ञान त्यांनी आपल्या भाषेत आणले. आपल्याला हे निर्माण करावे लागेल, असे प्रयत्न करणाऱ्या प्रतिभावंतांच्या पाठीशी शासन उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मराठी साहित्यातील सर्वोच्च अशा ‘जनस्थान’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू यांना ‘जनस्थान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सौ. अरुणा साधू, ग्रंथाली प्रकाशनाचे संस्थापक दिनकर गांगल, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कार्यवाह लोकेश शेवडे व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, इतिहासात डोकावल्यास दोन प्रकारच्या भाषा टिकल्याचे समोर येते. एक आक्रमणकर्त्यांची भाषा आणि दुसरी जगण्याची व्यवस्था निर्माण करणारी भाषा. मराठी भाषा कधी कोणावर आक्रमण करू शकत नाही; पण मराठीला व्यवहाराची भाषा बनवता येईल. आज गुगलवर एखादी माहिती इंग्रजीत चटकन मिळते; मराठीत तसे होत नाही. आपल्याला हे निर्माण करावे लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)