वाहन परीक्षकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंगच; वाहतूक नियंत्रक होणार वाहक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 07:43 AM2022-01-22T07:43:04+5:302022-01-22T07:43:24+5:30
एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक यांचा वापर संपकाळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महामंडळाच्यावतीने परिपत्रक जारी केले आहे.
मुंबई : संपात सहभागी असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे वारंवार आवाहन करून देखील कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी महामंडळ त्यांच्यावर कारवाई करत असून देखील कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामध्ये मुख्यतः चालक व वाहक यांचा समावेश असल्याने राज्यात एसटीच्या बसेस रस्त्यावर धावू शकल्या नाहीत. यामुळे आता एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक यांचा वापर संपकाळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महामंडळाच्यावतीने परिपत्रक जारी केले आहे.
पहिल्या टप्प्यात चालक पदावरून वाहन परीक्षक व सहायक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना २ दिवसांचे प्रशिक्षण देऊन, संपकालावधीत एसटी बसेसवर चालक म्हणून नेमण्यात येणार आहे. तर वाहतूक नियंत्रक म्हणून ज्या वाहकांना पदोन्नती देण्यात आली, त्या वाहतूक नियंत्रकांना संपकालावधीत वाहक म्हणून जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त एसटी बस रस्त्यावर चालविण्याकरिता अशा विविध उपाययोजना अंमलात आणत असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. राज्यातील सर्व एसटी विभाग नियंत्रक, कार्यशाळा व्यवस्थापक व मध्यवर्ती कार्यशाळांना सूचना दिल्या आहेत.
ज्या यांत्रिक कर्मचाऱ्यांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे, अशा कर्मचाऱ्यांची माहिती विभागीय पातळीवर गोळा करून, त्यांच्याकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये तत्काळ ऑनलाईन अर्ज करून बिल्ला काढण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्यांना ७ दिवसांचे प्रवासी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणानंतर समितीचा अहवाल समाधानकारक असल्यास त्या कर्मचाऱ्यांना चालक म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संपकालावधीत खातेवाहन व मार्ग तपासणी वाहनांसाठी वापर करण्यात येणार आहे.
खाते वाहन व मार्ग तपासणी वाहनांवर नेमणूक केलेल्या चालकांना बसेसवर चालक म्हणून नेमण्यात येणार आहे. संपकाळात चालक आणि वाहक म्हणून नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दर दिवशी ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.