कार्यक्रमावर सेनेची छाप
By admin | Published: January 24, 2016 12:48 AM2016-01-24T00:48:25+5:302016-01-24T00:48:25+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा एसटीच्या मुंबई
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात पार पडला. मात्र, सरकारी असलेल्या या कार्यक्रमावर पूर्णपणे शिवसेनेची ‘छाप’ दिसून आली. सरकारी असलेल्या आणि घोषित केलेल्या योजनांना ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ नाव देण्यात आले. घोषणा सरकारी जरी असल्या, तरी कार्यक्रम हा शिवसेनेचाच असल्यासारखा वाटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकूणच या सरकारी कार्यक्रमाला ‘इव्हेंट’चे स्वरूप आले होते.
परिवहन विभाग आणि एसटीच्या संयुक्त विद्यामाने घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिवहन विभाग व एसटीकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबई सेंट्रल आगारात होणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कार्यक्रमाला स्थानिक शिवसेना कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात दिसून आले. आगारात शिवसेनाप्रमुखांचे मोठमोठे होर्डिंग्ज, तर आगाराबाहेर शिवसेना नेत्यांचे बॅनर्स आणि झेंडे लावण्यात आले होते. (प्रतिनिधी)
प्रवाशांचे हाल
मुंबई सेंट्रल आगारात कार्यक्रम होणार असल्याने, या आगारातील सर्व बससेवा परेल आणि दादर टीटी येथून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत बससेवा बंद राहणार होत्या, परंतु याची माहिती नसलेले काही प्रवासी आगारात येत होते. मात्र, सेवा आज बंद असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगताच, प्रवासी आपले सामान आणि मुलाबाळांसह पुन्हा दादर
आणि परेलच्या दिशेने जात होते.
एसटी आणि परिवहनच्या योजना
- अपघातात मृत पावलेल्या प्रवाशाच्या नातेवाईकाला दहा लाख रुपये मिळणारी अपघात सहाय्यता विमा योजना.
- भाडेतत्त्वावरील ५00
एसी शिवशाही बसेस
- एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय
- एसटी कर्मचाऱ्यांसाठी कन्यादान योजना
- दुष्काळग्रस्त भागातील
दहा हजार तरुणांना रिक्षा परमिट आणि कर्जपुरवठा.
- एसटी कर्मचाऱ्यांना
वैद्यकीय उपचारासाठी सुपरस्पेशलिटी रुग्णालय
- महिलांना रिक्षा परमिटमध्ये पाच टक्के आरक्षण, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी रिक्षा परमिट
प्रत्यक्षात ‘शिवशाही’ अवतरलीच नाही?
एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर ५00 एसी बसेस दाखल होणार आहेत. या बसेसनाच ‘शिवशाही’ बस नाव देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार मुंबई सेंट्रल येथील कार्यक्रमात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवशाही बस सगळ्यांसमोर सादर करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र, ही शिवशाही बस नव्हतीच, असे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. ५00 एसी बसची निविदा प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या जयंत्तीनिमित्ताने शिवशाही बससेवेची घोषणा करण्याचे आधीच नियोजन करण्यात आल्याने एसटीची चांगलीच पंचाईत झाली.
त्यामुळे महामंडळाने स्कॅनिया कंपनीच्या एका एसी बसला रंगरंगोटी करून ही बस सादर केल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही बस सादर करताना परिवहनच्या नियमांनाही तिलांजली देण्यात आली. न्यायालयाच्या निर्देशानुसार बसच्या काचा पारदर्शक असायला हव्यात, परंतु ही बस पूर्णपणे भगव्या रंगाने आणि झेंड्यांनी रंगविण्यात आली होती. ही बस सांभाळण्यासाठी स्कॅनिया कंपनीचे कर्मचारीही उपस्थित होते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या हातातही भगवे झेंडे
देण्यात आल्याने हा सरकारी कार्यक्रम आहे की, शिवसेनेचा हेच अनेकांना समजत नव्हते. त्यातच एसटीकडून ‘शिवशाही’बस सादर करताना, त्यावर भगवा रंग आणि झेंडा दाखवण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पूर्णपणे इव्हेंटचे स्वरूप देण्यात आले होते. इव्हेंट पाहणाऱ्या एका खासगी कंपनीला हे काम देताना चांगलीच रक्कम मोजण्यात आल्याची चर्चाही एसटीत रंगली.