सावत्र आईने अल्पवयीन मुलीला दलालास विकले

By Admin | Published: July 3, 2016 10:27 PM2016-07-03T22:27:31+5:302016-07-03T22:27:31+5:30

एका सावत्र आईने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पुण्यातील दलालाला अवघ्या 20 हजार रुपयांमध्ये विकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून ही मुलगी बांग्लादेशची आहे

The step mother sold a younger daughter to the Dalas | सावत्र आईने अल्पवयीन मुलीला दलालास विकले

सावत्र आईने अल्पवयीन मुलीला दलालास विकले

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३ : एका सावत्र आईने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पुण्यातील दलालाला अवघ्या 20 हजार रुपयांमध्ये विकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून ही मुलगी बांग्लादेशची आहे. कात्रज भागातील एका घरामध्ये या मुलीला आठवडाभर कोंडून ठेवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या खोलीमध्ये आणखीही मुलींना डांबून ठेवण्यात आल्याचे या मुलीने पोलिसांना सांगितले आहे. पिडीत मुलगी कात्रज चौकात कावरीबावरी फिरत असताना तिला एका चिकन विक्रेत्याने पोलीस चौकीत नेल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन भारती विद्यापीठ पोलिसांनी तिच्या सावत्र आईसह दलाल सोहेल व एक अनोळखी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी बांग्लादेशातील दख्खन अलीखली या जिल्ह्यातील आहे. तिच्या आईचे निधन झालेले असून मागील काही वर्षांपासून ती सावत्र आईसोबत रहात होती. सावत्र आई तिचा नेहमी छळ करुन मारहाण करायची. तिला काम लावण्याच्या उद्देशाने भारतात आणण्यात आले. पिडीत मुलीला घेऊन सावत्र आई एका व्यक्तीसह ७ जून रोजी रेल्वेने पुणे स्टेशन येथे आले. साधारणपणे सकाळी १० च्या सुमारास सोहेल नावाचा व्यक्ती त्यांना भेटला. बोलणी करुन पिडीत मुलीला सोहेलच्या हवाली करण्यात आले. सावत्र आई 20 हजार रुपये घेऊन निघून गेली. जाताना तिने सोहेल तुला घरकामास लावेल असे तिने सांगितले होते. त्यानंतर पिडीत मुलगी, दलाल सोहेल व सोबत आलेला व्यक्ती तिघेजन पुणे स्टेशनवरुन आॅटोरिक्षाने कात्रजला आले.

कात्रजमध्ये असलेल्या एका बंगल्यात मुलीला डांबून ठेवण्यात आलेले होते. या बंगल्यामध्ये आणखीही पाच मुली होत्या. सोहलेने पिडीत मुलीचे हात व तोंड बांधून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. पिडीत मुलगी २९ जून रोजी मुलगी दुध आणण्याच्या बहाण्याने बाहेर आली. कात्रज बस स्टँडवर आल्यानंतर तिने बांगलादेश येथे जाण्यासाठी बसची विचारणा केली. मात्र, तिची भाषा कोणाला कळत नव्हती. बसथांब्यावर कावरीबावरी होऊन फिरत असताना एका चिकन विक्रेत्याचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्याने पिडीत मुलीला जवळच्याच पोलीस चौकीमध्ये नेले. परंतु तिची भाषा पोलिसांना कळत नव्हती. वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तिची भाषा समजून येत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी रात्री हडपसरच्या रेस्क्यू होमच्या महिला पदाधिका-यांना बोलावून घेतले. त्यांच्यासोबत या मुलीला पाठवण्यात आले. सुधारगृहामध्ये बंगाली बोलणा-या अन्य महिलांनी पिडीत मुलीकडे विचारपूस केल्यावर तिने सर्व हकीकत सांगितली. तिची वैद्यकीय तपासणी सुरु करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

 

पुणे रेल्वे स्थानकावरुन पिडीत मुलगी व दोघे रिक्षात बसल्यानंतर सोहलने कात्रजला चल, असे म्हटल्याचे तिने ऐकले होते. ते कात्रज परिसरातील एका टेकडीवर आले. तेथे तिला एका बंगल्यात नेल्यानंतर तिथे पाच मुली असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. तसेच त्या आरोपींना व पिडीत मुलीस ते ठिकाण दाखवल्यानंतर ओळखता येईल, असेही तिने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे कात्रजमध्ये मुलींच्या खरेदीविक्रीचे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



पोलिसांच्या बैठकांचा सकारात्मक परिणाम
भारती विद्यापीठ पोलिसांमार्फत रिक्षाचालक, गॅरेजवाले, गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे, कामगार आदींच्या वारंवार बैठका घेण्यात येत आहेत. त्यांना संशयास्पद काही आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यातूनच एका चिकन विक्रेत्याने पिडीत मुलीला थेट पोलीस चौकीमध्ये आणले. एका नागरिकाच्या जागरुकतेमुळे गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
- विजयसिंह गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे

Web Title: The step mother sold a younger daughter to the Dalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.