आबांची एक पायरी!
By Admin | Published: February 17, 2015 02:11 AM2015-02-17T02:11:26+5:302015-02-17T02:11:26+5:30
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आर. आर. आबा यांची निवड झाली. हार-तुरे, अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आर. आर. आबा यांची निवड झाली. हार-तुरे, अभिनंदनाचा वर्षाव सुरू होता. त्या गर्दीतून वाट काढत आबा गाडीत बसले आणि थेट मलबार हिलवरील विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या बंगल्याकडे निघाले. मोहिते-पाटील उपमुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणार होते. त्यांना खूपच कमी कालावधी मिळाला होता. पुन्हा संधी मिळावी अशी त्यांना अपेक्षा होती; पण २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व करणारे आणि संपूर्ण महाराष्ट्र सव्वाशे सभांनी ढवळून काढणारे आर. आर. आबा यांना संधी देण्याचा निर्णय मोठ्या साहेबांनी घेतला होता. आबा खूप आनंदी होते; पण मनात खंत होती मोहिते-पाटील नाराज झाल्याची.
अंजनीहून एस.टी.ने जिल्हा परिषदेचे सभागृह गाठण्यासाठी पायात स्लिपर घालून येणारे आबा सांगली शहरातील काँग्रेस कमिटीजवळ उतरून चालत जायचे. ते आबा आम्ही पत्रकारांनी पाहिले होते आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरून जात असताना मी त्यांना फोन केला, अभिनंदन केले आणि शुभेच्छाही दिल्या. त्यांची दोनच वाक्यांत उत्तरे होती, ‘‘खूप आभारी आहे. खूप काम करायचे आहे.’’ तुम्हाला मोठी संधी मिळाली असे म्हणताच ते म्हणाले, ‘‘आता माझ्या कामासाठीची जागा शोधण्यासाठी एक पायरी चढावी लागेल.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘ही पायरी मोठी आहे; पण ती तुम्ही मिळवालच!’’
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न उराशी बाळगून काम करणारा हा कार्यकर्ता होता; पण कधी अंजनी सोडली नाही, अंजनीचा विचार सोडला नाही आणि कधी महाराष्ट्राचा विचार केल्याशिवाय गप्पही बसला नाही. १९९० च्या निवडणुकीपासून पुढील सहा निवडणुका त्यांच्या मतदारसंघात जाऊन पाहिल्या आहेत. प्रत्येक निवडणूक संघर्षमय असली, तरी ती जिंकायची कशी याचे सूत्र केवळ त्यांनाच माहीत असायचे. वातावरण पाहून कार्यकर्ते अस्वस्थ, मित्र नाराज आणि त्यांच्यावर प्रेम करणारे पत्रकार, ‘आबांचे काही खरे नाही, वातावरण फारच खराब आहे’ असे म्हणायचे; पण हा नेता लोकल ते ग्लोबल नव्हे, पण लोकल ते स्टेट लेव्हलचे राजकारण नेहमी जगत आलेला आहे. गावाचा विचार करतानाच राज्याचे हित नेहमीच सांभाळून ते राजकारण करीत आलेले आहेत. १९९० मध्ये पहिली निवडणूक जिंकल्यानंतर सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून जमेल तेवढी कामे करीत बसण्याऐवजी पहिल्याच वर्षी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. त्याच्यामागे विचार असा होता, की आपण महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहोत, केवळ तासगावचे लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या व्यासपीठावर संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडणे ही आपली जबाबदारी आहे, ही भूमिका पहिल्या पायरीवरच त्यांनी घेतली होती. ती अखेरपर्यंत पाळली. स्वत:चा पक्ष सत्तेवर असताना नागपूरच्या २३ दिवसीय अधिवेशनामध्ये २७ लक्षवेधी सूचना मांडण्याचा विक्रम त्यांनी केला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी ‘लक्षवेधीकार’ असा त्यांचा गौरव केला होता. केवळ सात वर्षांच्या विधिमंडळाच्या कारकिर्दीनंतर ‘पहिला उत्कृष्ट संसदपटू’ हा पुरस्कार त्यांनाच मिळाला होता.
जी जबाबदारी आपल्याला मिळाली, ती घेऊन लोकहितकेंद्रित राजकारण करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. आमदारपदाची १० वर्षे आणि मंत्रिपदाची १४ वर्षे त्यांनी अशाच पद्धतीने सांभाळली. जेव्हा पक्षात नेतृत्व करण्याची वेळ आली, तेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आणि शहरी भागातील मध्यमवर्गीयांमध्ये आबांचे भाषण ऐकायला झुंबड उडायची. त्यातून केवळ विरोधकच नव्हे, तर स्वपक्षातील नेतेदेखील नाराजी व्यक्त करायचे. हे प्रसिद्धीचे आणि वलयाचे भाग्य आपल्याला का लाभत नाही, असे मानणारे डझनभर नेते त्यांच्याच पक्षात आहेत. त्यापैकी काहींनी पत्रकारांना जेवण देऊन त्यांच्यावरील प्रकाशझोत कमी करा, असे आमिष दाखविण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. त्याचे अनेक साक्षीदार पत्रकार आजही महाराष्ट्रात कार्यरत आहेत.
आर. आर. आबांनी संस्थात्मक केले नाही किंवा संस्था उभारल्या नाहीत, असे म्हटले जाते. मात्र, सांगली जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघाची गेली तीन दशके मी पाहिली आहेत. त्यातली स्थित्यंतरे पाहिली आहेत. शेतीमध्ये झालेला विकास पाहिला आहे. द्राक्षाच्या शेतीला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. सातारा जिल्ह्यातील आरफळहून आणलेले पाणी तासगावच्या टोकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी धडपड केली. ताकारी आणि म्हैसाळ योजनेतून प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी कसे पोहोचविता येईल, यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. शेतकऱ्यांची गरज केवळ पाणी आहे आणि ती पूर्ण केली तर विकासाचे दरवाजे शेतकरीच उघडतील यावर त्यांचा ठाम विश्वास होता, हे ते वारंवार बोलून दाखवीत आणि तशी कृतीदेखील त्यांनी केली. त्यामुळेच सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायती शेती आणि बेदाणा उद्योग देशात नाव कमवू शकला, याचे संपूर्ण श्रेय आर. आर. आबांना द्यायला हवे. कवठेमहांकाळच्या दुष्काळाबद्दल अनेक दशके पाणी परिषदा घेऊन लोक थकले; पण या भागाचे प्रतिनिधित्व जेव्हा आर. आर. आबांकडे आले, त्या वर्षापासून आजपर्यंत कवठेमहांकाळमधून जाणारी अग्रणी नदी बारमाही वाहू लागली. ‘‘कवठेमहांकाळचा दुष्काळ मला कायमचा संपवायचा आहे’’ हे वाक्य त्यांच्या तोंडून दहावेळा तरी ऐकले आहे.
या स्थानिक प्रश्नाबरोबरच राज्यातील लोकांच्या हिताचाही ते सातत्याने विचार करीत होते. त्यासाठी केवळ दोन-तीन उदाहरणे देणार आहे. २००५ मध्ये कृष्णा खोऱ्यात महापूर आला, तेव्हा या पुराला कोणती कारणे असतील, याचा शोध घेत त्यांनी अलमट्टी धरण हे कारण शोधून काढले. त्यावर त्यांनी आवाज उठविला. कृष्णा खोऱ्यातील पाणीवाटपाचा लवाद असेल, तेव्हा महाराष्ट्राची बाजू त्यांनी हिरीरीने मांडली. बारबालांचा विषय तर खूपच गाजला. ज्या दिवशी लक्षवेधी सूचना विधिमंडळात आली होती, ती राखून ठेवून विचार करायला वेळ मागून घेतला. मित्रांना, अभ्यासकांना, समाजशास्त्रज्ञांना, पत्रकारांना फोन करून या बंदीचे काय परिणाम होतील, याचीच चर्चा ते रात्रभर करीत होते. त्यापैकी मी एक आहे. रात्री साडेअकरा वाजता त्यांचा फोन आला आणि मी उद्या बार डान्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेणार आहे. परिणाम काय होतील, असा प्रश्न केला. ही बंदी घालताना केवळ दोनच कारणे ते देत होते. एक या व्यवसायाशी पोलीस खात्याच्या येणाऱ्या संबंधातून भ्रष्टाचार वाढतो आहे आणि ग्रामीण भागातून येणारी युवकांची पिढी बरबाद होते आहे, हे मला रोखायचे आहे. या विषयावरून प्रचंड गदारोळ होईल असे म्हणताच, ‘‘होऊ दे, ती आपल्याला अंगावर घ्यायची सवयच आहे, त्यातून महाराष्ट्राचे प्रबोधन झाले तर आपली कमाई झाली असे मी मानेन.’’ त्यांच्या या उत्तराने मी थक्क झालो होतो. वाद अंगावर घेण्याचीही त्यांची सवय होती आणि ती केवळ समाजहिताच्याच दृष्टीने होती. त्यामुळे ते सतत प्रसारमाध्यमांत गाजत-वाजत राहिले. सत्ताही हवी, पण ती लोककल्याणासाठी हवी, ही धारणा असल्यामुळे अधिक व्यापक काम करण्यासाठी वरचे पद असायला हवे, असाच दृष्टिकोन त्यांना होता. त्यातूनच ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणाले होते, ‘‘आता एक पायरी राहिली आहे.’’ मुख्यमंत्री म्हणून खूप अधिकार असतात आणि ते जनतेच्या हितासाठी राबविता येतात, या वर त्यांचा ठाम विश्वास होता. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती ग्रामसभा, पारदर्शी पोलीसभरती, महिलांसाठी राखीव जागा, अशा अनेक गोष्टी आबांनी आपल्या कारकिर्दीत केल्या. उत्तम वाचन हा त्यांचा गुण कोणीही हेरला नसेल. एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी त्यांना भेटल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ प्रमुख पाहुणे आहेत असे सांगताच त्यांचे ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ पुस्तक वाचले आहे का, असा प्रश्न केला. तेव्हा मी अचंबितच झालो. अशा या गावच्या कार्यकर्त्याला राज्याचा कारभार करण्याची संधी मिळाली नाही, ती एक पायरी
चढायची राहून गेली, हे आबांचे नव्हे, महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
वसंत भोसले