स्टीफनला रक्तदानाने श्रद्धांजली
By Admin | Published: July 21, 2016 03:40 AM2016-07-21T03:40:25+5:302016-07-21T03:40:25+5:30
मुंबई पोलीसांचा ब्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टीफन मिनेझीस याला त्याच्या पहिल्या स्मृतीदिनी रक्तदान आणि वृक्षारोपण करून ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.
वसई : नानभाट येथील समाजमित्र आणि मुंबई पोलीसांचा ब्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टीफन मिनेझीस याला त्याच्या पहिल्या स्मृतीदिनी रक्तदान आणि वृक्षारोपण करून ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.
१९ जुलैला त्याच्या देहरुपी जाण्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमीत्त स्टीफन मिनेझीस मित्र परिवार मंडळाने रविवारी विविध र्काक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी त्याचे वडील फ्रान्सिस यांच्या हस्ते वृक्षरोपणाने सुरवात करण्यात आली. त्यानंतर बोळींज ते नानभाट या रस्त्यावर नागरिकांनी वृक्षारोपण केले. यावेळी सर्व रोपट्यांची जोपासना करून त्यांची पूर्ण वाढ करण्याची शपथही यावेळी घेण्यात आली.
१० वाजता रक्तदान शिबीरात ९२ जणांनी रक्तदान करून स्टीफनला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विद्याविहार ट्रस्ट केळवण आणि चुळणे येथील फातिमा माता येथील ७० अनाथ मुलींसोबत स्रेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी स्टीफनचे कार्य कथन करतानाच, विद्यार्थ्यांचे मनोरंजनही करण्यात आले. यावेळी स्टीफनच्या स्मरणार्थ भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. (प्रतिनिधी)
।कोण होता मिनेझीस?
नानभाट येथील स्टिफन मिनेझीस हा तरूण एअरटेल कंपनीत नोडल आॅफीसर म्हणून कार्यरत होता. या पदावर काम करताना त्याने अनेक गंभीर गुन्ह्यात पोलीसांना मदत केली होती. त्याच्या मदतीमुळे अशक्यप्राय वाटणारे अनेक गुन्हे मुंबई पोलीसांनी उघडकिस आणले होते. त्यामुळे तो जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मुंबई पोलीसांचा ब्रेन म्हणून ओळखला जात होता.
कोणतीही समस्या स्टीफन जनसंपर्कामुळे लीलया सोडवायचा. त्यामुळे त्याचा परिवार खूप मोठा होता. ग्रामस्थांना तोच एक मोठा आधार होता. आपल्या वसई तालुक्यातून किमान १० धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे. असे त्याचे स्वप्न होते. तो स्वत: एक उत्तम धावपटू होता. अनेक स्पर्धांमध्ये त्याने पारितोषिके पटकावली होती.
गेल्या वर्षी १९ जुलैला मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावतांना हृदयविकाराने त्याचे निधन झाले. या बातमी कळल्यावर वसई तालुक्यातच नव्हे तर त्याच्या मुंबईतील मित्र परिवारात शोककळा पसरली. त्याने केवळ ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेताना स्टीफनने आपला आदर्श लोकांपुढे ठेवला. लोकांसाठी जगा,त्यांच्या समस्या सोडवा. असा संदेश देतानाच त्याने वसई तालुक्यात आपल्या मित्र परिवारातर्फे अनेक उपक्रम राबवले होते. मृत्युनंतर त्याच्या इच्छेनुसार नेत्रदानही करण्यात आले.