कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘स्मार्ट मैत्रीण’साठी पाऊल

By admin | Published: June 6, 2017 04:10 AM2017-06-06T04:10:14+5:302017-06-06T04:10:14+5:30

पर्यावरण दिनाचे निमित्त साधून सोमवारी केडीएमसीची दोन रुग्णालये व मुख्यालयात ‘स्मार्ट मैत्रीण’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Steps for Kalyan-Dombivali Municipal Corporation's 'Smart Girlfriend' | कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘स्मार्ट मैत्रीण’साठी पाऊल

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘स्मार्ट मैत्रीण’साठी पाऊल

Next

मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पर्यावरण दिनाचे निमित्त साधून सोमवारी केडीएमसीची दोन रुग्णालये व मुख्यालयात ‘स्मार्ट मैत्रीण’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात व्हेंडिंग मशीनमधून सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होईल. तसेच वापरलेल्या नॅपकीनची शास्त्रोक्त विल्हेवाटही तेथे होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम पर्यावरणपूरक आणि शून्य कचरानिर्मिती करणारा ठरणार असल्याचा दावा उपक्रम राबवणाऱ्या ‘अ‍ॅक्शन कमिटी अगेन्स्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टीस’ या संस्थेने केला आहे.
केडीएमसीच्या शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालयांत दोन मशीन, तर महापालिका मुख्यालयात एक मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. ‘अ‍ॅक्शन कमिटी अगेन्स्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टीस’चे अध्यक्ष राजेंद्र धेंडे यांनी सांगितले की, एका सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व बर्न या मशीनची किंमत ९६ हजार रुपये आहे. कॉर्पोरेट सोशल फंडाच्या (सीएसआर) माध्यमातून या तीन मशीन बसवल्या आहेत.’
त्याचबरोबर, या संस्थेने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहा ठिकाणी ही यंत्रे कार्यान्वित केली आहेत. त्यासाठी मार्शल फोर्स कंपनीने सीएसआर फंड उपलब्ध करून दिला आहे. गोव्यातील पणजी येथेही तीन ठिकाणी ही यंत्रे बसवली आहेत. तेथे यंत्रे बसवण्यासाठी नेसले कंपनीकडून सीएसआर फंड मिळाला आहे. वेंगुर्ला नगरपालिकेत तीन ठिकाणी ही यंत्रे बसवली आहेत. केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेशात बऱ्यापैकी जागरूकता आहे. महाराष्ट्रात आमची संस्था ‘स्मार्ट मैत्रीण’चा उपक्रम हा पथदर्शी प्रकल्प राबवत आहे.
एका मशीनमधून ३०० महिलांसाठी नॅपकीन जनरेट होऊ शकतात. त्यांनी नॅपकीनचा वापर केल्यावर चार दिवसांत वापरलेल्या नॅपकीनची विल्हेवाट एका दिवसात यंत्रातच लावली जाऊ शकते. शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावल्यावर एका नॅपकीनच्या डिस्पोजलनंतर अर्धा ग्रॅम राख तयार होते. ही राख कुठेही फेकून देता येत नाही. यंत्रात जमा झालेल्या राखेची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था रांजणगाव येथे आहे. विविध ठिकाणी बसवलेल्या सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीनमधून जाळलेल्या नॅपकीनची राख रांजणगावाला नेली जाते. मशीन कार्यान्वित केल्यावर पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची हमी संस्था घेणार आहे. हे काम संस्थेचे पदाधिकारी वीरेंद्रसिंह पाटील व प्रीतम गोंधळेकर पाहणार आहेत.
बँका, शाळा, महाविद्यालये, न्यायालये, मॉल्स, रुग्णालये सोसायट्या येथे हे मशीन कार्यान्वित करता येऊ शकते. वापरलेले नॅपकीन महिला प्लास्टिकच्या काळ्या कॅरी बॅगमध्ये टाकून कुठेही टाकतात. त्यामुळे प्रसाधनगृहे व ड्रेनेजमध्ये या पिशव्या अडकून ते तुंबतात. विविध ठिकाणच्या डम्पिंग ग्राउंडवर जाणाऱ्या एकूण कचऱ्याच्या प्रमाणापैकी १० टक्के कचरा वापरलेल्या सॅनिटरी नॅपकीनचा असतो. हा जैव वैद्यकीय कचरा असल्याने त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे या उपक्रमातून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
कंपन्यांनीच लावली पाहिजे विल्हेवाट
सॅनिटरी नॅपकीनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीच नॅपकीनची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे, असा निर्णय राष्ट्रीय हरित लवादाच्या दक्षिण झोन असलेल्या चेन्नईत लवादाने दिला आहे.हाच निर्णय लवादाच्या अन्य झोनमध्येही लागू होऊ शकतो. सध्या सामाजिक संस्था पुढाकार घेऊन सीएसआर कंपन्यांच्या फंडातून ही यंत्रे विविध महापालिका हद्दीत उपलब्ध करून देत असली, तरी भविष्यात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाच विल्हेवाटीची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.
>कचरा डेपो नव्हे, पर्यटनस्थळ
वेंगुर्ला येथे अत्यंत लहान नगरपालिका आहे. शहराची लोकसंख्या १२ हजार आहे. या पालिकेने कचरा व्यवस्थापन उत्तम प्रकारे केले आहे. या कार्याबद्दल पालिकेला आतापर्यंत नऊ वसुंधरा पुरस्कार मिळाले आहेत. यंदाही पर्यावरणदिनी या नगरपालिकेला वसुंधरा पुरस्कार मिळाला आहे. सरकारने दोन कोटी ५० लाख रुपये नगरपालिकेला दिले आहेत. या पालिकेच्या कचरा डम्पिंग ग्राउंडवरच २० मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.तेथे कचरा डेपो नसून पर्यटनस्थळ असे लिहिले आहे. वेंगुर्ल्यासारखी छोटी नगरपालिका कचरा व्यवस्थापनाचे काम उत्तम प्रकारे करून पुरस्कार मिळवते. पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ल्याचा आदर्श अन्य बड्या महापालिकांनी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Steps for Kalyan-Dombivali Municipal Corporation's 'Smart Girlfriend'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.