मातंग समाजाच्या मोर्चावर लाठीमार
By admin | Published: December 19, 2015 01:59 AM2015-12-19T01:59:41+5:302015-12-19T01:59:41+5:30
अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना सरकारने न्याय द्यावा, या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनचे संस्थापक प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वात
नागपूर : अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना सरकारने न्याय द्यावा, या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनचे संस्थापक प्रा. रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी जबर लाठीमार केला. त्यात प्रा. भरांडे यांच्यासह पाचजण गंभीर तर २५ मोर्चेकरी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मातंग समाजाच्या मागणीसाठी नांदेड ते नागपूर पायीवारी करीत शुक्रवारी सकाळी मोर्चेकरी नागपुरात पोहचले. दुपारी यशवंत स्टेडियम येथून मोर्चाने विधिमंडळाकडे कुच केली. मोर्चात मोठ्या संख्येने महिला, लहान मुली, वृद्धांचा समावेश होता. मोर्चा श्रीमोहिनी परिसरात पोहचल्यानंतर पोलीस पथक तेथे तैनात होते.
मोर्चेकऱ्यांचे नेते भरांडे आणि काही तरुणांनी बॅरिकेट्स काढून विधिमंडळाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना बराच वेळ थांबवून ठेवले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचा आक्रोश आणखी वाढला. एक-दोघांनी बॅरिकेट्स ओलांडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
मोर्चेकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने, पोलिसांनी शेवटी लाठीमार करायला सुरुवात केली. वृद्ध महिला, पुरुष न बघता दिसेला त्याला झोडपून काढले. काही जणांनी श्रीमोहिनी कॉम्प्लेक्समध्ये पळ काढला. पोलिसांनी त्यांना शोधून काढत त्यांनाही चांगलाच चोप दिला. जीवाच्या आकांताने सैरावैरा पळालेल्या मोर्चेकऱ्यांच्या चपला, कपडे मोर्चास्थळी पडलेले होते. काही महिला लहान मुलांसोबत मोर्चात सहभागी झाल्या होत्या. लाठीमारामुळे त्यांची मुलांशी ताटातूट झाली. जखमींवर मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सरकारने ठेवला मोर्चेकरांवर ठपका
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक कंत्राटी संघटनेतर्फे १५ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चावर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्यासाठी शासनाने मोर्चेकऱ्यांनाच जबाबदार धरले आहे. आंदोलन हिंसक झाल्यामुळेच त्यांच्यावर पोलिसांनी उपलब्ध बळाचा वापर केल्याचे निवेदन शुक्रवारी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत केले.
या मोर्चात २० ते २५ हजार लोक सहभागी झाले होते. मोर्चेकरी बॅरिकेट्स तोडून विधानभवनाकडे धावू लागले. जळती लाकडे, दगड, विटा पोलिसांवर फेकू लागले होते, त्यामुळे उपलब्ध बळाचा वापर करून मोर्चेकऱ्यांना परतावून लवण्यात आले, असे शिंदे यांनी सांगितले.