अजूनही इन मेकिंग!
By admin | Published: October 4, 2015 01:23 AM2015-10-04T01:23:51+5:302015-10-04T01:23:51+5:30
महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला निर्णायक दिशा देण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी काही निवडक क्षेत्रात जागतिक मक्तेदारी उभारावी लागेल.
-नितीन पोतदार (कॉर्पोरेट लॉयर)
महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला निर्णायक दिशा देण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी काही निवडक क्षेत्रात जागतिक मक्तेदारी उभारावी लागेल.
देशातील उद्योगस्नेही राज्यांच्या क्रमवारीत गुजरात राज्य पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे, असा केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या सहयोगाने तयार केलेल्या एका अहवालात त्यांनी ही क्रमवारी घोषित केली आहे. आश्चर्य म्हणजे या अहवालानुसार आंध्र प्रदेश दुसऱ्या स्थानावर, झारखंड तिसऱ्या स्थानावर, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पाचव्या स्थानावर आहे. एकूण लालफितीचा कारभार कुठल्या राज्यात जास्त आहे, हे त्यावरून ठरले आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी, म्हणून उत्तर प्रदेशाने ‘उमीदों का प्रदेश’ची घोषणा करीत मुंबईतून काही हजार कोटींची गुंतवणूक आपल्याकडे वळती केली. आता तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि इतर राज्येदेखील मुंबईत येत आहेत. प्रश्न महाराष्ट्र पहिला की दुसरा हा नसून, इतर राज्ये आता मुंबईत येऊन इथला पैसा आपल्याकडे घेऊन जात आहेत, हा जास्त गंभीर आहे.
याचं मुख्य कारण म्हणजे परदेशी गुंतवणुकीच्या आकडेवारीत महाराष्ट्र जरी पुढे दिसत असला तरी अजूनही आपली कुठल्याही उद्योगक्षेत्रात जागतिक ओळख तयार झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुण्याचे आयटी क्षेत्र बघता बघता चंद्राबाबू नायडूंनी हैदराबादला नेले़ चेन्नईने आपल्याकडे येणारा मोटर-कार व्यवसाय उभारला हे आपल्याला कळलेदेखील नाह़ टाटाने आपली ‘नॅनो’ कोलकात्यावरून थेट साणंद-गुजरातला नेली आणि आपण बघत बसलो. गेल्या दोन दशकांच्या आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या काळात व माहिती आणि तंत्रज्ञानाच्या महापुरात महाराष्ट्र दिशाहीन झालेला दिसतो. या काळात आपण कुठल्याच क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकलेलो नाही. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सेझला परवानग्या मिळाल्या; पण दुर्दैवाने एकही सेझ अजून सुरू झालेले नाही. तसेच महाराष्ट्रात एमआयडीसीच्या माध्यमातून आपण छोट्या छोट्या उद्योगांचे मोठे जाळे निर्माण करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. आत्महत्या करणारे शेतकरी, कर्जबाजारी सहकारी कारखाने आणि श्रीमंत संचालक ही आमच्या सहकार क्षेत्राची ओळख. संपूर्ण चित्रपटसृष्टीची सुरुवात एका मराठी माणसाने मुंबईत केली आणि जगातला सगळ्यात मोठा रामोजी स्टुडिओ हैदराबादमध्ये साकार झाला आणि आपण आपला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ वाचवू शकलो नाही. बघता बघता साऊथची फिल्मसिटी मुंबईच्या हिंदी सिनेमापुढे निघून गेली, तर आपल्या मराठी सिनेमाला अजूनही नीट श्वास (आॅस्करवारीला पाठवूनदेखील) घेता आलेला नाही. म्हणूनच उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री मुंबईत येऊन आपल्या हिंदी फिल्मजगताला आमंत्रण देतो आणि आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही.
आज जिथे प्रत्येक राज्य उद्योजकांसाठी चोवीस तास दरवाजात आरती घेऊन उभे असताना, आपण मात्र एक खिडकी की दोन खिडक्या करीत बसलो आहोत. ‘महाराष्ट्र’ या नावातच एक मोठ्या राष्ट्राची संकल्पना आहे, जर उद्योग उभा राहिला तरच राज्याच्या इतर विकासकामांना गती येईल. राज्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याला ‘अर्थ’ प्राप्त होईल. म्हणूनच महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राला एक निर्णायक दिशा देण्याची गरज आहे. त्यासाठी काही निवडक क्षेत्रांत आपली जागतिक मक्तेदारी उभारावीच लागेल. आज महाराष्ट्रात मीडिया अॅण्ड एन्टरटेन्मेंट (मुंबई), पर्यटन (कोकण) आणि शिक्षण क्षेत्र (पुणे-नाशिक) चांगले काम होऊ शकते. त्यात एका निश्चयाने प्रयत्न केले तर नक्कीच आपण एक मोठी मजल मारू शकतो. या तिन्ही उद्योगांतून मोठ्या प्रमाणात तरुणांकरिता रोजगारनिर्मिती होऊ शकते. रस्ते, बंदरे व वीज अशा पायाभूत सुविधांसाठी देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याला लागणारी अवजड मशिनरींची निर्मिती (नागपूर-चंद्रपूर) विदर्भात होऊ शकते. अशा काही निवडक क्षेत्रासाठी खास सवलती द्याव्या लागतील. त्यासाठी महाराष्ट्राला परदेशात जाऊन या क्षेत्रांसाठी जोरदार मार्केटिंग करावे लागेल. या क्षेत्रात होणारी प्रत्येक मोठी गुंतवणूक (देशी किंवा परदेशी) ही महाराष्ट्रातच व्हायला पाहिजे, असा आपला आग्रह आणि त्यापेक्षाही निर्धार असायला हवा.