पश्चिम रेल्वेकडून एसी डबल डेकरला अद्याप नो एन्ट्री
By Admin | Published: May 4, 2015 02:02 AM2015-05-04T02:02:26+5:302015-05-04T02:02:26+5:30
कोकणवासियांसाठी असलेल्या एसी डबल डेकर ट्रेनला पश्चिम रेल्वेकडून अजूनही ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी लोअर परेल वर्कशॉपमध्ये
मुंबई : कोकणवासियांसाठी असलेल्या एसी डबल डेकर ट्रेनला पश्चिम रेल्वेकडून अजूनही ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी लोअर परेल वर्कशॉपमध्ये जाणारी ट्रेन अजूनही वसई यार्डातच उभी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत लवकरच येईल, अशी आशा बारगळली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेकडून एसी डबल डेकर ट्रेन मागील वर्षीच्या गणेशोत्सवात चालविण्यात आली. मात्र प्रिमियम म्हणून ट्रेन धावल्याने या ट्रेनचे भाडे मागणीनुसार वाढत गेले आणि अव्वाच्यासवा भाड्यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ही ट्रेन दिवाळीत नॉन प्रिमियम म्हणून धावली. परंतु दिवाळीत कोकणात जाण्यासाठी गर्दीच नसल्याने अत्यंत अल्प प्रतिसाद या ट्रेनला मिळाला. त्यानंतर ही ट्रेन देखभाल-दुरुस्तीसाठी सायडिंगलाच ठेवण्यात आली. ही डबल डेकर ट्रेन असल्याने देखभाल आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेकडे जागाच नसल्याने तीला पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल येथील वर्कशॉपमध्ये पाठविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ही ट्रेन कांदिवली येथे सायडिंगला ठेवण्यात आली. अजूनही एसी डबल डेकर वसई येथेच उभी आहे. लोअर परेल वर्कशॉपमध्ये जागा उपलब्ध नाही. सध्या गर्दीचा सिझन असल्याने पश्चिम रेल्वेच्या गाड्या देखभाल-दुरुस्तीसाठी वर्कशॉपमध्ये आहेत. त्यामुळेच ही समस्या सतावत असण्याची शक्यता आहे असे नरेन्द्र पाटील (मध्य रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी) यांनी सांगितले.