अद्याप 'अभ्यास' सुरू, मराठा आरक्षण कृती अहवाल उद्याच सादर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 12:18 PM2018-11-28T12:18:02+5:302018-11-28T12:20:24+5:30
मराठा आरक्षणाबाबत कृती समितीचा अहवाल आज न्यायालयात ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत आज एटीएआर म्हणजेच कृती अहवाल आज सभागृहात मांडण्यात येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह कायदेतज्ज्ञ वकिलांची बैठक घेतली. त्यानंतर आजही मराठा आरक्षण कृती अहवाल सभागृहात सादर केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, 29 सप्टेंबर रोजी अहवाल सादर होण्याची दाट शक्यता आहे.
मराठा आरक्षणाबाबत कृती समितीचा अहवाल आज न्यायालयात ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आज कायदेतज्ज्ञांची भेट घेऊन या अहवालासंदर्भात माहिती जाणून घेतली. त्यानंतर, हा अहवाल उद्या म्हणजेच गुरुवारी सभागृहात ठेवण्यात येणार असल्याचे समजते. कारण, या अहवालात कुठल्याही कायेदशीर किंवा तांत्रिक त्रुटी राहू नयेत. तसेच या आरक्षणाला कोर्टातही मंजुरी मिळावी, म्हणून अहवालाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतरच, अहवाल पूर्ण सभागृहात ठेवला जाईल, अशी माहिती आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीतील चर्चेनंतर गुरुवारी अहवाल सभागृहात सादर केला जाईल.
दरम्यान, सरकारने ATR न मांडता पूर्ण अहवालच सभागृहात मांडावा अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली असून विरोधपक्ष त्यावर अडून आहे. काँग्रेस हा अहवालावरच अडून आहे तर राष्ट्रवादी ATR मांडण्यासाठी तयार होत नसल्याचे समजते. दरम्यान, या अहवाल सादरीकरणामुळे सर्वच पक्ष आमदारांसाठी व्हीप काढणार असून आमदारांना पूर्णवेळ सभागृहात बसण्याचा आदेश देण्यात येणार आहे.