...तरीही ईच्छितस्थळी बदली!
By admin | Published: June 22, 2016 04:06 AM2016-06-22T04:06:01+5:302016-06-22T04:06:01+5:30
ज्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध चार महिला वैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षणार्र्थींनी गैरवर्तणुकीच्या तक्रारी केल्या त्या अधिकाऱ्यास सन्मानाने इच्छितस्थळी पुण्यात बदली
यदु जोशी, मुंबई
ज्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध चार महिला वैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षणार्र्थींनी गैरवर्तणुकीच्या तक्रारी केल्या त्या अधिकाऱ्यास सन्मानाने इच्छितस्थळी पुण्यात बदली देण्याचा प्रकार सार्वजनिक आरोग्य विभागात झाला आहे.
संबंधित चार महिला डॉक्टरांनी तीन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेऊन सदर आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध गंभीर तक्रारी केल्या होत्या. रात्री-बेरात्री हे अधिकारी आम्हाला रुग्णालयात विनाकारण बोलावतात, असे त्यांनी म्हटले होते. या तक्रारींची दखल घेऊन संबंधित आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी त्यांचा विनंती अर्ज मान्य करून पुण्यात बदली करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वैद्यकीय अधिकारी राहुल घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच, या प्रकरणी सावंत यांचे पीए सुनील माळी यांना हटविण्याची मागणीही त्यांनी केली होती. काही आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झालेल्या घोळाची चर्चा सध्या विभागात आहे. बालरोग तज्ज्ञ डॉ. आनंद सातारकर यांची सातारा येथून कोल्हापूरच्या प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली. विभागामध्ये तज्ज्ञांची कमतरता असताना त्यांना प्रशिक्षणाच्या कामात गुंतवण्यात आले. डॉ. वंदना वसो या एमबीबीएस असताना त्यांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात पदस्थापना देण्यात आली. डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. संदीप पाटील हे जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे शासनामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करीत असतानासुद्धा त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नेमण्यात आले. विशेषज्ञांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी पदस्थापना देऊ नये, असे धोरण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गट ब च्या एका आरोग्य अधिकाऱ्याचे नक्षलकनेक्शन असल्याचा अहवाल असतानादेखील त्याला जिल्ह्यातच ठेवण्यात आले. एक अधिकारी दोन वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर असतानादेखील त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल; नाशिक येथे सन्मानाने बदली देण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील बहुतांश बदल्या विनंतीनुसार करण्यात आल्या. प्रशासकीय बदल्यांचे प्रमाण त्या तुलनेने फारच कमी आहे. डॉ. महेश खलिपे, डॉ. मिलिंद पोरे, डॉ. अविनाश आहेर, डॉ. पूजा सिंह, डॉ. गीता खरात, डॉ. शोभा राजुरे, डॉ. सुरेखा आठवले, डॉ. बबिता कमलापूरकर, डॉ. आसोले आदींची ज्येष्ठता डावलून तुलनेने कनिष्ठ असलेल्यांना पदस्थापना देण्यात आली. भाजपाचे एक मंत्री आरोग्य विभागात नेहमीच ढवळाढवळ करत असतात. या मंत्र्यांचा एक पाय नेहमी आरोग्य विभागातच असतोे, असे गमतीने म्हटले जाते.
सूत्रांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी आरोग्य मंत्री सावंत यांनी आपल्या मंत्री कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची मते काही महिन्यांपूर्वी जाणून घेतली होती. त्यावेळी बहुतेक सर्वांनी सुनील माळींविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. मात्र, तरीही माळींना अभय देण्यात आले. सावंत यांच्या कार्यालयातील दोन वरिष्ठांनी अलिकडेच, ‘उगाच भानगडीत कशाला पडायचे’ असा विचार करीत दीर्घ रजा घेतली असून ते मूळ कार्यालयात परत जाणार आहेत. दरम्यान, आज आरोग्य संचालकांच्या अखत्यारित झालेल्या सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सक्तीच्या रजेवर कसे?
आरोग्य मंत्र्यांचे पीए सुनील माळी हे कळवण; जि. नाशिक येथे उपजिल्हाधिकारी होते. तेथून ते प्रतिनियुक्तीने मंत्री कार्यालयात आले. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मंत्री आस्थापनेवरील कर्मचाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठविण्याची प्रथा नाही. आतापर्यंत असे कधीही घडलेले नाही. माळी यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या दोन आमदारांनी माळींविरुद्ध तक्रार केली होती. शिवसेनेच्या बैठकीत देखील या तक्रारी आल्या होत्या.