पोलीस अधीक्षकांनीच केले स्टिंग आॅपरेशन...!
By admin | Published: February 24, 2015 11:39 PM2015-02-24T23:39:21+5:302015-02-25T00:06:57+5:30
विद्यार्थ्यांचाही सहभाग : पोलिसांच्या आत्मीयतेत आढळली कमतरता
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस खात्यातील सेवा सुधारण्यासाठी व पारदर्शक कारभार व्हावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनीच स्टिंग आॅपरेशन केले. दहा ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी दाखल करून त्यांनी पोलीस खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचा अंदाज घेतला आहे. पोलिसांकडून सेवा मिळते, पण त्या वागणुकीत आत्मीयतेचा अभाव असल्याचा निष्कर्ष त्यांच्या पाहणीतून पुढे आला असून, त्यावर मात करण्यासाठी गेले दोन महिने ते पोलीस प्रशिक्षणाचा आगळावेगळा उपक्रम राबवीत आहेत.जनतेला पोलिसांकडून चांगली सेवा मिळावी, तक्रार दाखल करून घेताना आपुलकीने, आदराने वागविले जावे, फिर्याद दाखल करून घेतली जात नाही, अशा तक्रारी येऊ नयेत, पोलिसांबाबत जनतेत विश्वास निर्माण व्हावा यासाठीच हा उपक्रम डॉ. शिंदे यांनी मिडास टच कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविला.
असे झाले आॅपरेशन
जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारदार पाठविण्यात आले. तक्रार दाखल करताना पोलिसांकडून कशी सेवा मिळते, वागणूक कशी मिळते, याचा आढावा घेण्यात आला. सर्वच ठिकाणी तक्रार दाखल करून घेतली गेली. मात्र, त्यावेळी पोलिसांकडून जी आत्मीयता दाखवली जाणे आवश्यक होते, ती काही ठिकाणी दाखवली गेली नाही. हीच मुख्य बाब या आॅपरेशनमधून उघड झाली.