एसटीला वर्षाला २४0 कोटींचा तोटा

By Admin | Published: November 8, 2016 05:10 AM2016-11-08T05:10:27+5:302016-11-08T05:10:27+5:30

शहरी व ग्रामीण भाग यातील एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे एसटी मानली जाते. मात्र, राज्यातील ग्रामीण भाग आणि खासकरून दुर्गम भागात ‘बंधनकारक’ सेवा देताना एसटी महामंडळाला

STL losses of 240 crores annually | एसटीला वर्षाला २४0 कोटींचा तोटा

एसटीला वर्षाला २४0 कोटींचा तोटा

googlenewsNext

मुंबई : शहरी व ग्रामीण भाग यातील एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे एसटी मानली जाते. मात्र, राज्यातील ग्रामीण भाग आणि खासकरून दुर्गम भागात ‘बंधनकारक’ सेवा देताना एसटी महामंडळाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागते. एसटी महामंडळाच्या दररोज जवळपास १४ हजार ९00 फेऱ्या तोट्यात धावत असून, या फेऱ्यांमुळे वर्षाला २४0 कोटी रुपये तोटा सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील ग्रामीण भागात खासकरून दुर्गम भागात प्रवाशांच्या मागणीनुसार, लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बंधनकारक फेऱ्या एसटीकडून चालविल्या जातात. महाराष्ट्रात ३७ हजार ४१७ खेडेगाव असून, यातील जवळपास ९५ टक्के गावांमध्ये एसटीकडून सेवा दिली जाते. मात्र, ही सेवा देताना महामंडळाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी महामंडळाकडून फायदा आणि तोट्यातील फेऱ्यांचे वर्गीकरण केले जाते. यात ए-वर्गातील फेऱ्या म्हणजे, फायद्यातील फेऱ्या, बी-वर्गातील फेऱ्या या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या, तर सी-वर्गातील फेऱ्या या पूर्णत: तोट्या चालणाऱ्या फेऱ्या असतात.
महामंडळाच्या दररोज एकूण ९७ हजार ६00 फेऱ्या धावतात. यातील ए-वर्गात २४ हजार ७00 फेऱ्यांचा समावेश आहे. तर बी-वर्गात ५७ हजार ९00 फेऱ्यांचा समावेश असून, सी-वर्गातील फेऱ्या या १४ हजार ९00 आहेत. म्हणजेच एकूण होणाऱ्या फेऱ्यांपैकी १४ हजार ९00 फेऱ्या हा पूर्णत: तोट्यातील आहेत. या फेऱ्यांमुळे महामंडळाला वर्षाला २४0 कोटींचा तोटा सहन करावा लागतो. एसटी महामंडळाकडून सध्या ज्या फेऱ्यांना प्रतिसाद नाही अशा फेऱ्या बंद केल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात धावणाऱ्या या फेऱ्या सामाजिक बांधिलकी म्हणून महामंडळाकडून चालविल्या जातात. तोट्यात धावणाऱ्या फेऱ्यांसाठी सरकारने अनुदान दिले, तर एसटी महामंडळाचा तोटा कमी होईल आणि एसटीला ते नुकसानदायक ठरणार नाही, असे मत एसटी अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: STL losses of 240 crores annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.